आगामी वर्षांत नागरिकांची सुरक्षितता यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेऊन संकटग्रस्त महिलांना तात्काळ मदत मिळावी यासाठी निर्भया मोबाईल व्हॅन ‘२४ बाय ७’ म्हणजे आठवडय़ाचे सात दिवस आणि २४ तास कार्यरत राहणार आहे. यासाठी स्वतंत्र दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी दिली. पोलिस दल ‘रेझींग डे’चे औचित्य साधत गुरूवारी निर्भया मोबाईल व्हॅनचे उद्घाटन सरंगल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
निर्भया व्हॅन आता २४ तास कार्यान्वित राहणार आहे. यासाठी खास महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या माध्यमातून निर्जन वस्ती, रेल्वे व बसस्थानक आदी परिसरात गस्त घातली जाणार आहे. शहरातील कोणत्याही भागात महिलेची छेडछाड अगर महिलाविषयक गुन्हे घडल्यास तात्काळ घटनास्थळी पोहोचून कारवाई करण्यात येईल. तसेच गस्ती दरम्यान रस्त्यावर वा अन्यत्र एकटय़ा भ्रमंती करणाऱ्या महिलेला सुरक्षिततेची गरज भासल्यास घरी पोहोचविण्याचे काम केले जाणार आहे. पती किंवा इतरांकडून मारहाण होत असल्याची माहिती मिळाल्यास दामिनी पथक तात्काळ कारवाई करणार आहे. यासाठी संकटग्रस्त महिलांनी ९७६२१ ००१००, ९७६२२ ००२०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सरंगल यांनी केले. गुरूवारपासून पोलीस दल रेजिंग डेला सुरूवात झाली असून ८ जानेवारी रोजी सप्ताहाचा समारोप होईल. या कालावधीत महाविद्यालयांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी मार्गदर्शन, महिला, मजूर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रार अर्जाची वरिष्ठांकडून छाननी, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर चर्चा, मुक्तीधाम मंदिरासमोर पोलीस बँड शो, निबंध स्पर्धा, एस. टी. बस चालकांसाठी कार्यशाळा, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतवाहिनीचे उद्घाटन, मोटार वाहन कायद्याबाबत जनजागृती असे विविध उपक्रम होणार आहेत.

Story img Loader