पाणीटंचाईवर मात करता यावी म्हणून सिमेंट साखळी बंधारे वेळेवर बांधले जावेत, तसेच जलसंधारण कामात लोकसहभाग वाढवावा, अशी अपेक्षा राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी व्यक्त केली. राज्यभरातील ४४० ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार मिळाला. यापैकी ४५ ग्रामपंचायतींचा राज्यपालांच्या हस्ते सोमवारी येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
संत तुकाराम नाटय़गृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल, राज्यमंत्री रणजित कांबळे, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, खासदार चंद्रकांत खैरे व रावसाहेब दानवे, जिल्हा परिषद प्रभारी अध्यक्ष विजया चिकटगावकर, महापौर कला ओझा आदी उपस्थित होते.
गेल्या वर्षी पाण्याची स्थिती गंभीर होती. आता काही ठिकाणी चांगला पाऊस असला, तरी पाण्याच्या योग्य नियोजनात केवळ सरकार फारसे काही करू शकणार नाही. जलसंधारण कामात लोकसहभागाची गरज आहे, असे सांगून राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी स्वच्छतेचे महत्त्व विशद केले. स्वच्छता नसेल, तर लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छतेसाठी केलेली गुंतवणूक आरोग्यावरील खर्चात बचत करणारीच ठरते, असे ते म्हणाले. गरिबीचा स्वच्छतेशी थेट संबंध असल्याने ग्रामीण भागात कुटीरोद्योग, लघुद्योगांच्या माध्यमातून आíथक विकासावर भर द्यायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. निर्मलग्राम पुरस्कार मिळवण्यात महाराष्ट्र सातत्याने आघाडीवर असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करतानाच संपूर्ण राज्य निर्मल बनवण्याचे स्वप्न साकारण्यास सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. निर्मलग्राम पुरस्कारात राज्याने जी आघाडी घेतली, त्यात ग्रामीण भागातील महिलांचे मोठे योगदान असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
मंत्री दर्डा यांनी निर्मल भारत अभियानामुळे ग्रामीण भागात नवीन नेतृत्व उदयास आल्याचे सांगितले. ग्रामीण भाग निर्मल करण्यासाठी राबविले जाते, तसेच अभियान शहरी भागासाठी निर्मलनगर नावाने राबविले जावे, अशी सूचनाही दर्डा यांनी केली. मंत्री सोपल यांनी गेल्या २ वर्षांत पाणीटंचाईचे संकट असताना निर्मल भारत अभियान चिकाटीने राबवताना राज्याला सर्वाधिक पुरस्कार मिळाले, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
राज्यपालांच्या हस्ते राज्यातील ४५ ग्रामपंचायतींचा पुरस्कार देऊन प्रातिनिधिक गौरविण्यात आले. सन २०११मध्ये राज्यातील ४४२ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार मिळाला. सातारा जिल्ह्यातील जावळी व वाई पंचायत समित्यांचाही गौरव करण्यात आला. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू यांनी प्रास्ताविकात गेली ७ वष्रे राज्य निर्मलग्राम पुरस्कार मिळवण्यात आघाडीवर आहे. सन २०१३-१४मध्ये राज्यात ६ लाखांहून अधिक शौचालये बांधण्यात येणार असून, त्यासाठी ५३६ कोटींची तरतूद केल्याची माहिती दिली. निर्मलग्राम यथोगाथा स्मरणिकेचे विमोचन या वेळी झाले. विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आभार मानले. उपसचिव शैला ए., जिल्हाधिकारी विक्रमकुमार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्यासह राज्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पवार, थोरात अनुपस्थित!
राज्यपालांचा कार्यक्रम म्हणजे शिष्टाचार आलाच. तो हवाच. राज्यस्तरावरील पुरस्कार वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार येतील, असे जाहीर करण्यात आले होते. तसा अधिकृत दौराही आला. पण पवार काही आले नाहीत. पवारच नाही, तर पालकमंत्री बाळासाहेब थोरातही फिरकले नाहीत. राज्यपालांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांना वरिष्ठ मंत्र्यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा