किशोर डोरलेंचा आरोप, चौकशीची मागणी
शहरातील कुठल्याही अपार्टमेंटमध्ये किंवा फ्लॅट ओनर्सला पाण्याचे नवीन कनेक्शन घेण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन विभागाच्या परवानगीशिवाय ‘ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट’ देता येत नसताना पूर्व नागपुरातील निर्मल नगरी निवासी संकुलामध्ये ते कसे देण्यात आले? असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करीत अग्निशमन विभागाचे सभापती किशोर डोरले यांनी महापालिका आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिले.
अपार्टमेंटमध्ये नळ कनेक्शन देताना ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील अनेक इमारतींनी ते घेतले नसल्यामुळे त्यांना नळ कनेक्शन देण्यात आले नाही. शहरातील काही अपार्टमेंट या संदर्भात कारवाई करण्यात आली होती. झोन कार्यालयातून हे प्रमाणपत्र दिले जाते. ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट नसेल तर नळ काढण्याची कारवाई केली जाते. मात्र, काही दिवसांपूर्वी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी निर्मल नगरीला प्रमाणपत्र दिले असून त्यांना नळ कनेक्शन देण्यात आले. प्रमाणपत्र नसेल तर शहरातील सामान्य नागरिकांवर कारवाई केली जाते. मात्र, कुठल्याही नामांकित बिल्डरच्या दबावाखाली येऊन जर महापालिकेच्या जलप्रदाय विभागातर्फे प्रमाणपत्र दिले जात असेल त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी डोरले यांनी केली. निर्मल नगरीमध्ये नवीन नळ कनेक्शन देताना त्याठिकाणी खराब व्हॉल्व बसविण्यात आले आहे. बिल्डरला प्रमाणपत्र दिले जाते तर सामान्य नागरिकांवर महापालिकेचा जलप्रदाय विभाग अन्याय का करतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महापालिका प्रशासन या संदर्भात कुठलीच कारवाई करीत नाही. महापालिकेच्या सभेमध्ये या विषयावर चर्चा होऊन निर्णय झाला असताना असे अवैधपणे प्रमाणपत्र कसे दिले जाते याची चौकशी करावी, अशी मागणीही डोरले यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirmal nagri complex get the occupancy certificate