राम जन्मोत्सवानिमित पोद्दारेश्वर मंदिरातून  काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्यावेळी काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी एकत्र येऊन प्रभूरामचंद्रांचा रथ ओढला. उद्या १० एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीत जनतेचा रथ कोण ओढणार? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीचा मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने  गडकरी आणि मुत्तेमवार यांनी दुपारी प्रचार आटोपला आणि चारच्या सुमारास पोद्दोरेश्वर मंदिरात पोहोचले. दिव्यरथावर प्रभूरामचंद्रांच्या मूर्ती आरुढ झाल्यानंतर एक एक करीत विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रभूरामचंद्रांचे दर्शन घेतले. यावेळी गडकरी, मुत्तेमवार यांच्यासह खासदार अजय संचेती, दीनानाथ पडोळे, रमेश बंग, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, दयाशंकर तिवारी आदी राजकीय नेते उपस्थित होते. गेल्या महिन्यांपासून निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरल्यानंतर भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत असताना निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मात्र एकत्र आले. यावेळी मुत्तेमवार आणि गडकरी यांनी एकमेकांशी संवाद साधला. प्रभूरामचंद्रांची पूजा झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी श्रीरामचंद्रांचा जयघोष करीत एकत्रितपणे रथ ओढला. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात राममंदिराचा मुद्दा असल्याने काँग्रेसकडून टीका करण्यात आली. प्रभूरामचंद्रांचा रथ ओढल्यावर जनतेचा रथ कोण ओढणार याबाबत परिसरात चर्चा होती.
यावेळी गडकरी यांनी रामनवमीनिमित्त नागपूरकर जनतेला शुभेच्छा दिल्या. विलास मुत्तेमवार म्हणाले, गेल्या १६ वर्षांपासून सातत्याने शोभायात्रेच्यावेळी येत आहे. त्यामुळे केवळ निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आलो असे नाही. प्रभूरामचंद्रांचा रथ दोघांनी ओढला असला तरी जो प्रामाणिक आणि जनतेची सेवा करणारा असेल त्याला प्रभूरामचंद्र निवडून देईल, असेही मुत्तेमवार म्हणाले.

Story img Loader