राज्यातील दुष्काळाची परिस्थिती बघता भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी महाराष्ट्रात कुठलाही जाहीर समारंभ किंवा गाजावाजा न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशा स्पष्ट सूचना स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान असल्याने नितीन गडकरी गेल्यावर्षी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे २७ मे रोजी मोठय़ा जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. मात्र, दरम्यानच्या काळात गडकरी यांच्यावर पूर्ती उद्योग समूहावरून लावण्यात आलेल्या आरोपांमुळे त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्षाचा राजीनामा दिला असला तर पूर्वी इतकाच आजही महाराष्ट्राच्या राजकारणावर दबदबा कायम आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी नागपुरातून लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून त्या दृष्टीने स्थानिक पातळीवर काम सुरू झाले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिीती बघता गडकरी यांनी यावर्षी वाढदिवसाला कुठलाही जाहीर कार्यक्रम आयोजित केला जाऊ नये अशा सूचना स्थानिक कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती बघता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, माजी मंत्री राम नाईक यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे कुठलाही जाहीर कार्यक्रम करण्यात आला नव्हता.
नितीन गडकरी यांनी वाढदिवसाच्या दिवशी कुठलाही जाहीर समारंभ किंवा गाजावाजा न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या असल्याची माहिती मिळाली असून मात्र या संदर्भात पक्षाच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला आहे. मात्र या संदर्भात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले. पूर्ती उद्योग समूहातर्फे गडकरी यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार होता. त्यासाठी छोटेखानी कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली मात्र त्याला गडकरी यांनी परवानगी दिली नसल्याची माहिती सूत्रानी दिली.

Story img Loader