लोकसभा निवडणूक दिवसेंदिवस जवळ येऊ लागल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचा मतदारसंघाचा नेमका ‘चॉईस’ कोणता याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे गडकरींनी जाहीर केले आहे. गडकरींचा सार्वजनिक कार्यक्रमातील वाढता सहभाग त्यांचे मनसुबे स्पष्ट करणारा आहे.
पूर्तीच्या सर्वसाधारण सभेपासून ते व्याख्यानांच्या कार्यक्रमात हिरीरीने हजेरी लावणारे गडकरी यानिमित्ताने जास्तीत जास्त जनसंपर्कावर भर देऊ लागले असून ही त्यांची निवडणूक तयारी समजली जात आहे. नागपुरातून काँग्रेसने विलास मुत्तेमवारांना पुन्हा उमेदवारी दिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत ही लढत देशाच्या केंद्रस्थानी असेल. कारण, गडकरी पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरणार असून राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांबरोबर वावरण्याची त्यांची स्वप्ने लोकसभा निवडणुकीतील विजयावर अवलंबून राहतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली तेव्हाही गडकरी संसदेच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते. विधान परिषद सदस्य असलेल्या गडकरींना पक्षाने एकदम सर्वोच्च स्थान भूषविण्याची संधी दिली. परंतु, दुसऱ्या टर्मच्या वेळी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने गडकरींवर दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळण्याऐवजी पायउतार होण्याची वेळ आली. मात्र, यातून सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या गडकरींना आता लोकसभेत प्रवेशण्याचे वेध लागले असून त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अगदी तळागाळातून बांधणी सुरू केली आहे.
भाजपच्या स्थानिक कॅडरला आता निवडणुकांच्या तयारीला जुंपण्याचे आदेश मिळालेले आहेत. जास्तीत जास्त सदस्यनोंदणी करून पक्षसंघटन बळकट करण्याचा तसेच बूथ पातळीवर पक्षाला अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला असून काँग्रेसच्या तुलनेत सध्यातरी आघाडी घेतली आहे. संघाचे मुख्यालय नागपुरात असल्यामुळे नागपूरची निवडणूक चर्चेत राहणार आहे. गडकरी संघाचे ‘ब्ल्यू बॉय’ असल्याने त्यांच्या विजयासाठी संघ स्वयंसेवकांनाही कामाला भिडण्याचा आदेश मिळाला आहे. स्वत: गडकरी जनसंपर्काची कोणतीही संधी सोडत नाहीत, असेच चित्र सध्यातरी दिसत आहे. दुसरीकडे नागपूर हा गडकरींसाठी सुरक्षित मतदारसंघ नसल्याचा मतप्रवाह आहे. त्यामुळे पर्याय म्हणून वर्धा लोकसभा मतदारसंघाचीही चाचपणी केली जात असल्याचे समजते. परंतु, भाजप सूत्रांकडून याला दुजोरा मिळालेला नाही. वध्र्यात दत्ता मेघे लढणार नसल्याचे स्पष्ट झाले असून त्यांनी पुत्र सागर मेघेंसाठी काँग्रेसश्रेष्ठींकडे जोर लावला आहे. गडकरी आणि दत्ता मेघे यांचे अत्यंत घनिष्ट आणि मित्रत्वाचे संबंध असल्याचे सर्वश्रृत आहे. त्यामुळे मेघेंच्या वारसदाराला काँग्रेसने उमेदवारी दिल्यास गडकरी वर्धेतून लढण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येते.