संघटनात्मक, रचनात्मक आणि आंदोलनात्मक कार्याद्वारे भाजपला यश मिळविता येत असून ही यशाची त्रिसूत्री मांडून संवाद, सहकार आणि समन्वय ठेवून कार्य करा, असे आवाहन भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले. भारतीय जनता पक्षातर्फे हनुमाननगरातील समाज भवनात आयोजित प्रभाग अध्यक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत संघटन बांधणीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या प्रयत्नांवर चर्चा करण्यात आली. भाजपचे प्रदेश महासचिव आमदार देवेंद्र फडणवीस, शहराध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, महापौर अनिल सोले, आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, उपमहापौर संदीप जाधव आदी उपस्थित होते.
पक्ष वाढीच्या दृष्टीने नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना काही टिप्स दिल्या. पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे त्यांच्या स्वभावानुसार कामे सोपविण्यात यावी, प्रत्येक प्रभागात कार्यालये सुरू करण्यात यावी, नेत्र तपासणी, रक्तदान यासारख्या उपक्रमाद्वारे नागरिकांना सेवा देण्यात यावी तसेच महिलांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घरोघरी पोहोचवावी आदी सूचना त्यांनी यावेळी केल्या. पक्ष बांधणीच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली. या बैठकीला प्रा. प्रमोद पेंडके, कैलाश चुटे, किशोर वानखेडे, संजय बंगाले यांच्यासह ७२ प्रभागातील अध्यक्ष उपस्थित होते. संदीप जोशी यांनी संचालन केले तर डॉ. रवींद्र भोयर यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा