नागपूर आणि लगतच्या परिसरात सुमारे ३५० वाघांचे वास्तव्य आहे आणि या व्याघ्रदर्शनासाठी पर्यटकांना नागपूरहून जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नागपूर हे ‘टायगर कॅपिटल’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून लावून धरली होती. नवनिर्वाचित खासदार व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही आता या मागणीला दुजोरा देऊन नागपूरकरांचे ‘टायगर कॅपिटल’चे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आश्वासन दिले.
महाराष्ट्रातील पाच व्याघ्र प्रकल्पांपैकी चार विदर्भात आणि एक अधिसूचनेच्या मार्गावर आहे. याशिवाय, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील व्याघ्र प्रकल्प मिळून नागपूर परिसरात सुमारे १३ ते १५ व्याघ्र प्रकल्प आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे कार्यालय नागपुरात सुरू झाले. या कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड व्याघ्र प्रकल्पांचा कारभार नियंत्रित केला जात आहे. या सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये जाण्यासाठी पर्यटकांना नागपूर हा एकमेव मार्ग आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्रदर्शनाने देशीविदेशी पर्यटकांना गेल्या काही वर्षांत आपल्याकडे खेचले आहे. जंगल आणि वन्यजीव हे विदर्भातील पर्यटनाचे सर्वात मोठे आकर्षण आहे. तत्कालीन केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी ‘गेट वे टू टायगर कंट्री’च्या रूपात मोठी आशा विदर्भाला दाखवली. ती प्रत्यक्षात येण्याआधीच वने आणि पर्यावरण विभागाच्या कार्यभार त्यांच्या हातून गेला. त्यामुळे हे स्वप्न स्वप्नच राहील की काय, असे वाटत असतानाच, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी ‘टायगर कॅपिटल’साठी पाठपुरावा करणे सुरू केले. दरम्यान, अलीकडेच त्यांच्याही हातातून खासदारकी गेली. मात्र, विरोधकांची ही मागणी म्हणून त्याला टोलवून न लावता, आता नितीन गडकरी यांनी नागपूरकरांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.
महाराष्ट्राच्या ३० टक्के एवढय़ा विदर्भात पर्यटनाच्या सर्वाधिक क्षमता आहेत. भारतात वर्षभरात येणाऱ्या पर्यटकांपैकी दहा टक्के पर्यटक वने व वन्यजीवप्रेमी आहेत. विदेशी पर्यटकांकरिता नागपुरात आंतरराष्ट्रीय विमानतळांसह थ्री आणि फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत. प्राचीन गुंफा, गडकिल्ले, मंदिर, तलाव अशी विपुल संपदा विदर्भात आहे. जंगल आणि निसर्गरम्य स्थळांचे पॅकेज करून पर्यटकांना दिले तर मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो. त्याकरिता केंद्रीय पर्यटन मंत्र्यांसोबत यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक अभ्यास करून ‘टायगर कॅपिटल’चे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Story img Loader