‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेतील श्रीकृष्णाच्या भूमिकेने अजरामर झालेला अभिनेता नितीश भारद्वाज हा आता कॅमेऱ्यामागे दिसणार आहे. ‘इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्स’ची निर्मिती असलेल्या ‘पितृऋण’ या मराठी चित्रपटाद्वारे तो दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करीत आहे.
प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांच्या ‘ऋण’ या कन्नड भाषेतील एका दीर्घकथेवर हा चित्रपट बेतलेला आहे. ३३ वर्षांपूर्वी डॉ. श्रीराम लागू यांच्यासमवेत भूमिका केलेल्या आणि त्यानंतर हिंदूी चित्रपटसृष्टी गाजविलेल्या अभिनेत्री तनुजा या पुन्हा मराठी चित्रपटामध्ये झळकणार आहेत. सचिन खेडेकर, सुहास जोशी, मृणाल देशपांडे आणि नवोदित अभिनेत्री पूर्वी भावे यांच्या या चित्रपटामध्ये भूमिका आहेत. ‘स्वदेस’ फेम महेश अणे हे या चित्रपटाचे छायालेखक (सिनेमॅटोग्राफर) असून कौशल इनामदार यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. पावसाळ्यामध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती नितीश भारद्वाज आणि श्रीरंग गोडबोले यांनी दिली.
दिग्दर्शनाची मोठी जबाबदारी असताना भूमिकेचे ओझे नको होते. माझ्यापेक्षाही सचिन खेडेकर या भूमिकेला न्याय देऊ शकेल याची खात्री असल्याने मी पडद्यावर न दिसण्याचे जाणीवपूर्वक ठरविल्याचे नितीश भारद्वाज याने सांगितले. कर्तव्य, प्रेम आणि प्रारब्ध यातून निर्माण झालेली रोमांचकारी कथा ‘पितृऋण’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दंतकथेचा वास असलेल्या या कथानकामध्ये रमविण्याची गोष्ट असल्याचे जाणवले, असेही त्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा