वेकोलिच्या विविध कोळसा खाणी, कोल वॉशरी, तसेच शहराच्या सभोवताल उभ्या असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यातून आम्लयुक्त पाणी इरई, झरपट व वर्धा या प्रमुख नद्यांमध्ये मिसळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा पाण्याची स्थिती ‘तेजाब’ पेक्षा वेगळी नसल्याने ते पिण्यायोग्य नसल्याचा दावा ग्रीन प्लॅनेट सोसायटीने केला आहे.
या जिल्ह्य़ातील वेकोलिच्या कोळसा खाणीतून, कोळसा हाताळणाऱ्या केंद्रातून, कोल वॉशरीजमधून वा कोळसा डेपोंतून बाहेर पडणार आम्लयुक्त पाणी अ‍ॅसीड माईन ड्रेनेज म्हणून ओळखले जाते. साधारणत: एखादी कोळसा खाण भूमिगत पाण्यापेक्षा जास्त खोलवर खोदली जात असेल तर अशा वेळी भूमिगत पाण्याच्या संसर्गात कोळसा आल्याने पाणीही रासायनिकदृष्टय़ा आम्लधर्मीय होते. नंतर पाण्याचा त्रास खाणकामाला होऊ नये म्हणून असे पाणी भूमिगत कोळसा खाणीतून वा उघडय़ाही खाणीतून बाहेर फेकल्यास जवळचा नाला वा नदीत असे अ‍ॅसीड माईन ड्रेनेज फेकलेले दिसते. त्यामुळे कोळसा खाण सुरू झाल्यानंतर तर ती खाण संपेपर्यंत अ‍ॅसीड माईन ड्रेनेज एक पर्यावरणीय डोकेदुखी होऊन बसते. या जिल्ह्य़ात नेमके तसेच झालेले आहे. बल्लारपूर, वणी, घुग्घुस, भद्रावती, चंद्रपूर, माजरी, दुर्गापूर, ऊर्जानगर, पदमापूर, सास्ती, राजुरा, गडचांदूर आम्लयुक्त पाणी जर सामान्य पाण्यासोबत मिसळत असेल तर सामान्य पाण्याचे तापमान झपाटय़ाने वाढते. काही वेळा हे तापमान ४७ अंशापर्यंत वाढलेले आढळते, तर पाण्याचे पोटेंन्शियल ऑफ हायड्रोजन (पीएच) मूल्य तीनपर्यंत कमी झालेले पहावयास मिळते. या दोन्ही गोष्टी नद्यांसाठी अत्यंत घातक आहेत. शुद्ध पाण्याचे पीएच मूल्य ७ इतके असावयास पाहिजे, ते कारखानदारीच्या परिसरात ६ पर्यंत कमी होत असते. ५ पर्यंतही कमी होणे धोकादायक समजले जाते, परंतु ते अ‍ॅसीड माईनच्या संदर्भात ३ पर्यंत कमी होत असते. कधी कधी उन्हाळ्यात असे पाणी जर बाष्पीभवनाने आटत असेल तर अशा पाण्याचे पीएच मूल्य शून्याजवळ आणि एखादे अपवादात्मक स्थितीत शून्याच्याही खाली आलेले असते. अशावेळी पाण्याची स्थिती ‘तेजाब’पेक्षा वेगळी नसते. त्यामुळे असे तेजाब असलेल्या नद्या, तलाव प्रवाह आणि भूमिगत पाणी एक विषारी जलपर्यावरण तयार करीत असते.
चंद्रपूरच्या परिसरातील इरई, झरपट, वर्धा या प्रमुख नद्या आणि वेकोलिच्या कोळसा खाणी असलेल्या बल्लारपूर, वणी, घुग्घुस, भद्रावती, चंद्रपूर, माजरी, दुर्गापूर, ऊर्जानगर, पदमापूर, सास्ती, राजुरा, गडचांदूर, मुंगोली व अन्य शहरातील नाले अशा भयानक स्थितीत सापडलेले आहेत. या जिल्ह्य़ाचे वैशिष्टय़ म्हणजे, जवळपास सर्वच नद्यांच्या परिसरात मुख्यत: उघडय़ा कोळसा खाणी जास्त आहेत. या नद्यांच्या परिसरातील नाले लालपिवळय़ा रंगाचे पाणी वाहून नेतांना दिसतात. हे पाणी एकदा पीएच मूल्य कमी झाल्यानंतर आम्लयुक्त पाणी गोड पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर आधीच्या पाण्याचे पीएच मूल्य वाढते. अशा पाण्याला ‘येलो वाय’ असे म्हणतात. या पाण्यात घातक धातूही असतात. प्रामुख्याने निकेल, तांबा, शिसे, आर्सेनिक, अल्युमिनियम, तसेच मॅगनीज यांचा समावेश आहे. त्यामुळे कोळसा खाणींना ‘कन्सेन्ट टू एस्टॅब्लिश’ देतांनाच या गोष्टींबाबत सक्त ताकीद देण्यात येते, परंतु एकदा मंजुरी मिळाल्यानंतर कोणत्याही कंपन्या याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्य़ात एकाही कोळसा खाणीने अ‍ॅसीड माईन ड्रेनेजबाबत विशेष योजना आखलेली वा त्यावर उपाययोजना केल्याचे आढळत नाही. त्यामुळे पाण्याचे भौतिक पैलू बदलतात. त्यात घातक खनिजांचे प्रमाण वाढते. हे सर्व कर्करोगासाठी कारणीभूत आहेत. पाण्याची आम्लता जबरदस्त वाढते. त्यावर उपाययोजना खोदलेला कोळसा शेडखाली ठेवावा, कोळशाजवळील कोणत्याही मातीला वा खडकांना उघडय़ावर ठेवू नये, भूमिगत कोळसा खाणीत कोळसा सिमजवळ भूमिगत पाणी येऊ देता कामा नये, पाण्याला ताबडतोब बाहेर काढणे गरजेचे आहे. कोळसा यार्डजवळ एएमडी मिटिगेटिंग टेक्निकचा वापर असावा. उघडय़ा कोळसा खाणी नद्यांच्या दूरवर खोदाव्या जेणेकरून पाण्याचा संपर्क तुटेल. एखाद्या खोदलेल्या व सोडून दिलेल्या खाणींना ताबडतोब बुजवावे. जेणेकरून जमिनीवरील पाणी अशा मातीच्या व उर्वरीत कोळसा सिमच्या संपर्कात येणार नाही.
उघडय़ा ओवरडंपवर वृक्षारोपण करावे. मात्र, वेकोलि वा संबंधित संस्थांकडून अशा प्रकारची कुठलीही उपाययोजना केली जात नाही, असे संशोधक प्रवीण मोते, ग्रीन प्लॅनेटचे प्रा.योगेश दुधपचारे यांचे म्हणणे आहे. तरी यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रीन प्लॅनेटने केली आहे.

Story img Loader