‘शिक्षक आणि माहिती व तंत्रज्ञान’ यांच्या सहाय्याने नॅशनल नॉलेज नेटवर्क (एनकेएन) चा अत्यंत दुर्मिळ प्रकल्प भारतात ग्रामीण भागात प्रथमच गोपाळपुरात राबवित आहे. याचे व्यवस्थापन कार्य यावर समाज अवलंबून आहे. त्यामुळे शिक्षकांनी सर्वप्रथम संगणकीकृत होऊन विद्यार्थ्यांना, कालांतराने समाजाला धडे द्यावेत  असे प्रतिपादन पुणे, नाशिक व दिल्ली या तीन विद्यापीठांचे माजी कुलगुरू प्रा. राम ताकवले यांनी केले.
भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रीसर्च इन्स्टिटय़ूट, पंढरपूरमध्ये एनकेएनचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले होते. त्याच्या पहिल्या टप्प्यात चार शाळांना वायफाय इंटरनेटद्वारे यशस्वी जोडणी करून आपापसात ज्ञान देवाण- घेवाणाची प्रक्रिया पार पडली होती. त्याची पाहणी आणखी दहा शाळा व पंढरपूर तालुक्यातील इतर शाळांना एनकेएनची जोडणी कशी करता येईल याची पाहणी व मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. ताकवले येथे आले होते.
पहिल्या सत्रात गादेगाव, अनवली, खर्डी, कासेगाव, ओझेवाडी, भंडीशेगाव, भाळवणी, चळे, आंबे, रोपळे, नांदुरे, नारायण चिंचोली अशा अनेक गावांतील विविध शाळेच्या मुख्याध्यापकांबरोबर ताकवले यांनी मुक्तपणे संवाद साधला. त्यांच्यासोबत भाभा अ‍ॅटोमिक रीसर्च सेंटरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. एम. पाटणकर, रयत शिक्षण संस्थेचे गुरूकुल प्रमुख ए. के. निकम, उदय पंचपूर, योगेश थोरवे आदी होते. प्रारंभी संस्थेच्या परंपरेनुसार पाहुणे व उपस्थित विविध मुख्याध्यापक यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी उपस्थितांना संस्थेचा परिचय करून देताना १५ वर्षांतील घडलेल्या घडामोडी, मिळालेली मानांकने, चढउतार, यातून मिळालेले यश यांचा उलगडा केला. पुढे बोलताना ताकवले म्हणाले, ‘एनकेएनच्या माध्यमातून ग्रामीण भागातून प्रत्येक विद्यार्थी या नवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब करून शिक्षकांबरोबर विद्यार्थी व आसपासचा परिसर यातील बदल व विकास होण्यास सुरुवात होईल तसेच विद्यार्थ्यांंना पुरविण्यात येणारे टॅबलेट पीसीचे कार्य व त्यातील तंत्रज्ञान यासाठी सर्व प्रथम शिक्षकांनी प्रशिक्षणाद्वारे पूर्ण माहिती घ्यावी. त्यामुळे त्याचा फायदा पुढे विद्यार्थ्यांना होतो.
यात स्वेरीचा पुढाकार महत्वपूर्ण असणार आहे. पुढील बदल स्वीकार करण्याची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. एकूणच या ठिकाणी स्वेरीमार्फत राबविल्या जाणाऱ्या एनकेएन या वाय फाय इंटरनेट नेटवर्क कार्यप्रणाली कल्पनेपेक्षा मोठी आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पाटणकर यांनी ‘या एनकेएनची चर्चा दिल्लीत सुरू असून त्याची हिंदुस्थानभर चर्चा होत आहे. भविष्यकाळात शहरात गेलेला नागरिक पुन्हा खेडय़ाकडे परतेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रयतचे निकम यांनी रयतमध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती देऊन गुरुकुल पद्धतीची ओळख करून दिली.
लोकशाहीने स्वावलंबी धोरण अवलंबिले पाहिजे हे त्यांनी ठासून सांगितले. योगेश थावरे यांनी सव्‍‌र्हरच्या माहितीद्वारे शहरात उपलब्ध तंत्रज्ञानाद्वारे बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती करून दिली. टॅबलेट कॉम्प्युटरद्वारे विद्यार्थी शाळेबाहेरही वायफायच्या मदतीने कोठेही अभ्यास करू शकतो असे सांगितले.
संशोधन विभागाचे डॉ. प्रशांत पवार यांनी संस्थेमध्ये सुरुवातीपासून राबवित असलेले संशोधन व प्रकल्प यांची माहिती एल.सी.डी. प्रोजेक्टरच्या माध्यमातून उपस्थितांना करून दिली.
 दुसऱ्या सत्रात प्राध्यापकांसाठी एनकेएनच्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. यात माजी कुलगुरू ताकवले यांनी एनकेएन प्रकल्प यावर बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल,उपाध्यक्ष एन.एस. कागदे, ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, डॉ. बागेश, प्रा. एस.एम. मुकणे, कॉम्प्युटर सायन्स विभागाचे विभाग प्रमुख ए.आर. सरकार, प्रा. अंतोष दायडे यांच्यासह विभागप्रमुख आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. या एक दिवसीय चर्चासत्राचे सूत्रसंचालन संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले तर आभार संशोधन विभागाचे डॉ. प्रशांत पवार यांनी मानले.      

Story img Loader