सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींना राज्य शासनाने अडीच एफएसआय जाहीर केल्याने नवी मुंबईत धोकादायक इमारतींचा घोळ सुरू झाला आहे. पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी दरवर्षी जाहीर होणारी धोकादायक इमारतींची यादी अद्याप जाहीर न झाल्याने या घोळाची चर्चा रंगली आहे. धोकादायक इमारती ठरविण्याचा अधिकार स्ट्रक्चरल अभियंत्यांना असताना स्थापत्य शास्त्राचा गंध नसलेले अधिकारी ही यादी दरवर्षी ठरवत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात वाशी येथील जेएनवन, जेएनटू प्रकारच्या इमारतींमुळे एफएसआय मंजूर झालेला असताना आयआयटीने १८ वर्षांपूर्वी धोकादायक ठरवलेल्या २०६ धोकादायक इमारतींपैकी केवळ १७ इमारती या यादीत आहेत. त्यामुळे पालिकेचे निकष आयआयटीपेक्षा जास्त आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
नवी मुंबई पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या आठवडय़ात प्रशासनाकडून ही यादी जाहीर केली जाते, पण यावर्षी शहरातील धोकादायक इमारतींना अडीच वाढीव एफएसआय मंजूर झाल्याने त्यात आपले उखळ पांढरे करून घेण्याचा काही अधिकाऱ्यांचा डाव असल्याचे दिसून येते. इमारत धोकादायक जाहीर करण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली आहे. त्याच्या अभिप्रायानंतरच इमारती धोकादायक जाहीर केल्या जाणार आहेत. शहरात धोकादायक इमारत हा शब्द केवळ वाशी येथील जेएनवन, जेएनटू प्रकारातील इमारतींमुळे रूढ झालेला आहे. वाशी सेक्टर ९-१० मधील इमारतींचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडू लागल्यानंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या इमारती धोकादायक आहेत की नाही हे तपासण्यासाठी सर्वप्रथम घोसालिया समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर आयआयटीचे प्रा. आर. जी. लिमये यांनी या इमारतींची पाहणी केली. या दोन समित्यांनंतर बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव मिराणी यांच्या अध्यक्षेतेखाली समितीने या इमारतींची पाहणी केली आणि या इमारतींची पुनर्बाधणी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी या सर्व समित्यांनी जेएनवन, जेएनटू प्रकारातील २०९ इमारती धोकादायक असल्याचे आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे, मात्र लिमये कमिटीने नमूद केलेल्या इमारतींची नावे पालिकेच्या यादीत अद्याप समाविष्ट झालेली नाहीत. त्यात केवळ १७ इमारतींची नावे आहेत. यामागे पालिकेचे अधिकारी आपले चांगभलं करून घेण्याच्या विचारात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पालिकेने गतवर्षी ८१ इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. त्यात यावर्षी दहा-बारा इमारतींची भर पडणार आहे. त्यामुळे ही संख्या ९२ ते ९३वर जाण्याची शक्यता आहे. या इमारती धोकादायक असल्याचे प्रथम प्रभाग अधिकाऱ्यांनी ठरविले असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ती यादी रद्द करून नवीन यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. वास्तविक इमारत धोकादायक ठरविण्याचा अधिकार हा केवळ स्ट्रक्चरल इंजिनीअर यांना आहे. त्यासाठी इमारतीच्या साहित्यांची तापसणी केली जाते, पण नवी मुंबईत हे निकष धाब्यावर मारले जात असून अधिकारी कठपुतळीसारखे वरिष्ठांच्या इशाऱ्यावर इमारत धोकादायक ठरवीत आहेत. वाशी सेक्टर नऊ व दहा येथे अनेक इमारतींची पुनर्बाधणी होऊन रहिवासी राहण्यास गेले, तरी पालिकेच्या यादीत या इमारती धोकादायक म्हणून गणल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Story img Loader