शहराचे विद्रुपीकरण आणि कधीकधी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास कारक ठरलेले अर्निबध फलक रोखण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला असताना दुसरीकडे महापालिकेने सोईस्करपणे मौनव्रत धारण केल्याचे पहावयास मिळत आहे. प्रमुख रस्ते व चौकात अपघातांना कारणीभूत ठरतील, या पद्धतीने राजकीय मंडळी वा पक्षांनी अनधिकृत फलक उभारल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे फर्मान यापूर्वीच पोलीस आयुक्तांनी काढले होते. त्यानुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई आता सुरू असली तरी त्यात प्रमुख राजकीय पक्ष आणि स्थानिक बडे नेते यांचा समावेश झालेला नाही. त्यांच्यावर कारवाई झाल्यास विद्रुपीकरणाच्या मानसिकतेला चाप बसू शकतो, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. पोलिसांनी या मोहिमेचा श्रीगणेशा केला असताना महापालिकेने मात्र नेहमीप्रमाणे बोटचेपे धोरण स्वीकारले आहे.
काही महिन्यांपूर्वी खुद्द उच्च न्यायालयाने प्रमुख शहरातीमधील फलक त्वरित काढण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी महापालिकेने काही फलक काढण्याची कारवाई केली होती. परंतु, नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे ती मोहीम राहिली. त्यामुळे शहरभर पुन्हा अनधिकृत फलकांचे साम्राज्य उभे राहिले. वास्तविक, न्यायालयाने फलकांवर ज्या राजकीय नेत्यांची छायचित्रे आहेत, त्यांनाही नोटीस बजावण्याचे निर्देश दिले होते. तथापि, पालिकेने त्या दृष्टीने कधी कार्यवाही केल्याचे ऐकिवात नाही. शहरात फेरफटका मारल्यावर अनधिकृत फलकांचे कसे पेव फुटते ते सहजपणे दिसते. प्रमुख चौक व रस्ते फलकांच्या जाळ्यात गुरफटल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. राजकीय नेत्यांच्या फलकांविरोधात कारवाई करताना पालिकेची कचखाऊ भूमिका राहिल्याने कार्यकर्त्यांना अधिक बळ मिळते. थातुरमातूर फलकांवर कारवाई करण्याचे पालिकेचे धोरण राहिल्याने हा प्रश्न समुळ नष्ट होऊ शकलेला नाही, असा आजवरचा अनुभव आहे.
या पाश्र्वभूमीवर, या विषयात पोलिसांनी लक्ष घातल्याने काहीअंशी चित्र बदलेल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे. शहरात अनधिकृतपणे लावल्या जाणाऱ्या शुभेच्छा फलकांमुळे वाहतुकीस अडथळे होऊन अपघातांची शक्यता असते. असे काही अपघात यापूर्वी घडलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी, खासगी इमारती, बांधकाम व रहदारीच्या मार्गावर ठिकठिकाणी राजकीय पक्षांकडून बेकायदेशीर फलक उभारले जातात. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी महापालिकेने परवानगी दिलेल्या जागेव्यतिरिक्त फलकांसाठी अन्य जागांचा वापर केला जाऊ नये अशी सूचना केली होती. पालिकेने निश्चित केलेल्या जागेवर फलक उभारताना संबंधितांना पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. खासगी इमारती, घरे व बांधकामांच्या ठिकाणीही असे फलक उभारले जाऊ नयेत. रस्ते व सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळे आणणारे फलक उभारले गेल्यास संबंधित व्यक्ती, राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सरंगल यांनी दिला होता. त्यानुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू झाली आहे. पवननगर चौकात स्वत:च्या वाढदिवसाचा फलक विनापरवानगी उभारल्यावरून अभय गोविंद पवार याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदल्या दिवशीही वेगवेगळ्या भागात असे फलक उभारणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वास्तविक, शहर फलकमुक्त करण्यासाठी ही योग्य वेळ असताना पोलिसांना मदतीला घेऊन पालिकेचा अतिक्रमण विभाग अनधिकृत फलकांविरोधात धडक कारवाई करू शकतो. संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई झाल्यास स्वस्तातील प्रसिद्धीला आपसूक आळा बसू शकतो. तथापि, आजवर पालिकेने या स्वरूपाची तक्रार कधी पोलीस ठाण्यात दिलेली नाही. सध्या पोलीस जे गुन्हे दाखल करत आहे, ते त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आहे. या प्रश्नात पालिकेची बोटचेपी भूमिका पुन्हा प्रकर्षांने पुढे आली आहे.
फलकांविरोधात पोलीस आक्रमक, तर पालिका थंड
शहराचे विद्रुपीकरण आणि कधीकधी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास कारक ठरलेले अर्निबध फलक रोखण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला असताना दुसरीकडे
First published on: 22-08-2013 at 07:27 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmc cool on flex board issue police takes aggressive action