अनधिकृत फलकांच्या भरलेल्या जत्रेमुळे अवघ्या नाशिकच्या सौंदर्याची दुर्दशा झाली असताना ज्यांचा या उभारणीशी थेट संबंध येतो, त्या राजकीय पक्षांनाही अनधिकृत फलक वरकरणी नकोसे वाटत असले तरी ‘नाशिक वृत्तान्त’ ने याविरोधात आवाज उठविल्यानंतर महापालिका प्रशासनाने दखल घेत अनधिकृत फलक काढण्यास सुरूवात केली आहे. शहरात अनधिकृत फलकांची बजबजपुरी माजल्यावर पालिकेला जाग आली असली तरी असे फलक लावणाऱ्यांविरोधात न्यायालयाच्या निर्देशांनुसार गुन्हे दाखल करण्याची हिंमत मात्र त्यांना दाखविता आलेली नाही. राजकीय पक्षांच्या प्रमुखांचीही असे फलक उभारण्याच्या करामती करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मानसिकता नाही. महापालिकेतील सत्ताधारी मनसे व भाजपचीही हीच स्थिती आहे. शहराचे विद्रुपीकरण आणि कधीकधी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास कारक ठरलेल्या अनधिकृत फलकांना सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे. प्रत्यक्षात फलक उभारण्यात मात्र कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मागे नाहीत. अशी फलकबाजी करणाऱ्या आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांविरूध्द कारवाई करण्याची हिंमत एकाही पक्षाने दाखविलेली नाही. अनधिकृत फलक लावण्याची सर्वच पक्षांमध्ये जणूकाही चढाओढ सुरू आहे की काय असे शहरात सर्वत्र नजर टाकल्यास दिसून येईल. यावर प्रत्येक पक्षांच्या स्थानिक प्रमुखांनी तसेच प्रतिनिधींनी सोयीसोयीची भूमिका मांडली आहे. इतर राजकीय पक्षांचेही अनधिकृत फलक असून केवळ आमच्या पक्षाचे नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. म्हणजे, इतर राजकीय पक्षांकडे बोट दाखवून शिवसेना आपणही फारसे वेगळे नसल्याचे मान्य करत आहे. महापालिकेत मनसे व भाजपची सत्ता असल्याने या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे फलक कोण हटविणार अशी जणू पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भावना आहे. सध्या उभय पक्षांशी संबंधित फलकांचे प्रमाण नगण्य असले तरी ते लागतच नाहीत, असे म्हणता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित पदाधिकारी व कार्यकर्ते अनधिकृत फलक उभारण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. काँग्रेसशी संबंधित मंडळीही प्रसिध्दीच्या या स्वस्तातील माध्यमाचा वापर करीत आहेत. राजकीय पक्षांच्या कुचकामी भूमिकेमुळे शहर अनधिकृत फलकांच्या जंजाळातून बाहेर पडू शकलेले नाही.
अनधिकृत फलक उभारणे चुकीचेच
शहराचे विद्रुपीकरण होईल आणि वाहतुकीला अडथळे निर्माण होतील या पध्दतीने काँग्रेसच्या कोणी पदाधिकाऱ्याने फलक उभारले असल्यास ते चुकीचे आहे. अनधिकृत फलकांच्या विषयावर पक्षाच्या बैठकीत नेहमी चर्चा होते. कोणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी असे फलक उभारु नये असे सूचित केले जाते. शहरात एखाद्या स्पर्धेच्या निमित्ताने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने फलक उभारले असल्यास त्याचा शोध घेतला जाईल. भविष्यात अनधिकृत फलक पक्ष कार्यकर्त्यांकडून उभारले जाणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल.
आकाश छाजेड, शहराध्यक्ष (काँग्रेस)
फलकबाजी ही तर विकृती
चौकात वरस्त्यांवर फलक उभारून विद्रुपीकरण करणे ही विकृती आहे. राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी आजवर या विकृतीला प्रोत्साहन दिले. या विकृतीचा आम आदमी पक्ष निषेध करतो. आमच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे शहरात कुठेही असे फलक लावले जात नाही आणि जाणार नाही. इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फलक उभारून शहराचे विद्रुपीकरण केले आहे. या विरोधात आप आंदोलन छेडणार आहे.
जितेंद्र भावे (जिल्हा समन्वयक, आम आदमी पक्ष)
सर्व राजकीय पक्षांनी उपाय योजावेत
शहरात केवळ शिवसेनेचे फलक नसून सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी असे फलक उभारले आहेत. एखाद्या पदाधिकाऱ्याची निवड झाल्यावर शिवसैनिकांमध्ये उत्साह असतो. त्यामुळे अशा निवडीबद्दल फलक लावताना रितसर परवानगी घेतली जाते. मात्र नाशिकरोड, बिटको, जेलरोड, मध्य नाशिक आदी भागात फेरफटका मारल्यास कोणाचा वाढदिवस, कोणाला शुभेच्छा या फलकांची जत्रा भरल्याचे दिसते. वास्तविक, अनधिकृत फलकांचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे. शिवसेनेचे पदाधिकारी फार फार तर दोन दिवस फलक उभारतात. पदाधिकाऱ्यांनी अनधिकृत फलक उभारला असल्यास तो देखील काढण्यास सांगितले जाईल. मात्र, इतर राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन फलकबाजीवर र्निबध आणायला हवेत.
विजय करंजकर (जिल्हाध्यक्ष, शिवसेना)
युवा सेनेचा अतिक्रमण विरोधी अधिकाऱ्यांना घेराव
शालिमारच्या शिवसेना कार्यालयाबाहेरील बाळासाहेब ठाकरे यांचा फलक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढून तिथेच टाकून अवमान केल्याची तक्रार करीत युवा सेनेतर्फे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली. शहरभर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनधिकृत फलक लागले आहेत. ते काढले जात नाहीत, असा आरोपही आंदोलकांनी केला. शिवसेनेचा अनधिकृत फलक काढण्यास विरोध नाही. परंतु, अतिक्रमण विभाग केवळ शिवसेनेला लक्ष्य करीत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. महापालिकेने पूर्वसूचना न देता ही कारवाई केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे ठिकठिकाणी फलक लागले आहेत. ते मात्र काढले जात नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. अतिक्रमण विभागात ठिय्या देत शिवसैनिकांनी नंतर एस. बी. वाडेकर यांना घेराव घातला. शिवसेनाप्रमुखांचा फलक काढणाऱ्या अधिकाऱ्याला समज देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
हेमंत शेट्टींना इशारा देणार
पंचवटीसह शहरभर फलक उभारणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित हेमंत शेट्टी यांच्यासह पक्षाचे जे कोणी पदाधिकारी प्रमुख रस्ते व चौकात वाहतुकीला अडथळा ठरतील अशा पध्दतीने फलक उभारतील त्यांना पक्षातर्फे इशारा दिला जाणार आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महापालिकेची परवानगी घेऊन व निश्चित केलेल्या अधिकृत ठिकाणीच फलक उभारण्याची वारंवार निर्देश दिले आहेत. रस्त्यात व चौकात फलक उभारल्याने अपघातांना निमंत्रण मिळू शकते. शहराच्या विद्रुपीकरणातही भर पडते. अनधिकृत फलकांमुळे नाशिकचे विद्रुपीकरण व्हायला नको, ही पक्षाची भूमिका आहे. यापुढे पक्षाचे कार्यकर्ते वा पदाधिकाऱ्यांनी असे फलक उभारल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला जाईल.
शरद कोशिरे, शहराध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस)
कारवाई करणे हे तर महापालिकेचे काम
पक्षाला विचारुन कोणी असे फलक उभारायचा विचार केला तर त्याला प्रतिबंध करता येईल. मात्र, कोणी परस्पर फलक लावले तर कारवाई करणे हे महापालिकेचे काम आहे. अधिकृतपणे फलक उभारण्यासाठी महापालिकेची नियमावली आहे. त्यानुसार फलक उभारले न गेल्यास सर्वाना समान न्याय या तत्वाने कारवाई व्हायला हवी. पालिका प्रशासनाने एका पक्षाचे फलक काढले आणि दुसऱ्या पक्षांचे फलक काढले नाही तर मग तो पक्षपातीपणा ठरू शकतो. अनधिकृत फलक काढले जावेत यासाठी भाजप आग्रही राहील.
लक्ष्मण सावजी (शहराध्यक्ष (भाजप)
अनधिकृत फलक हटविण्याचे काम सुरू
महापालिकेचा अतिक्रमण विभाग पक्की बांधकामे आणि इतर अनधिकृत बांधकामे काढण्याच्या कामात गुंतला होता. त्यामुळे शहरातील अनधिकृत फलक काढण्याची कारवाई थोडी संथ झाली. शहरात अनधिकृत फलकांची जत्रा भरण्यामागे हे कारण असावे. महापालिकेमार्फत अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई सुरू असून तिला आणखी वेग दिला जाईल.
अ‍ॅड. यतिन वाघ (महापौर, नाशिक)