महापालिकेच्या बाजार विभागाचे शहरातील बाजारपेठा, दुकाने, फेरीवाले आणि वाहनतळ यावर नियंत्रण असून त्यातून महापालिकेला मोठय़ा प्रमाणात महसूल प्राप्त होत होतो, पण त्या ठिकाणी पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे विक्रेत्यांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचे माध्यम असणाऱ्या विभागांपैकी बाजार विभाग महत्त्वाचा आहे. महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या शहरातील निरनिराळ्या बाजारापेठा व दुकान संकुलांचे नियंत्रण बाजार विभागामार्फत करण्यात येत असले तरी गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठांमध्ये सोयी पुरविण्याकडे या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात सीताबर्डीत महात्मा गांधी मार्केट (सुपर मार्केट), नेताजी मार्केट, गोकुळपेठ बाजार, गड्डीगोदाम मार्केट, बुधवार बाजार, महालातील चिटणवीस पार्क स्टेडियम, इतवारीतील दाजी कॉम्प्लेक्स, कमाल टॉकीज मार्केट, जागनाथ बुधवारी मार्केट, इतवारीतील पोहा ओळ, जुना मोटर स्टँड, दही बाजार, धान्य गंज, मस्कासाथ शॉपिंग कॉम्प्लेक्स, न्यू कॉटन मार्केट, सदर लिंक रोड, सदर डिस्पेसंरी कॉम्प्लेक्स, कॉटन मार्केट, संत्रा मार्केट, महात्मा फुले बाजार शॉपिंग कॉम्प्लेक्स, सदरमधील मंगळवारी बाजार आदी बाजारपेठा आणि दुकाने महापालिकेच्या मालकीची आहेत. तसेच रेल्वे स्टेशन परिसर, मेडिकल चौक, एस.टी. बसस्थानक, रेल्वे फिडर रोड इत्यादी ठिकाणी छोटे व्यवसाय करण्यासाठी तसेच दुकानदारांनी रस्त्यालगत अतिक्रमण करू नये यासाठी महापालिकेतर्फे ‘मिनी शॉप्स्’ बांधून भाडय़ाने दिले आहेत.
याशिवाय शहरात निरनिराळ्या भागात व्यवसाय करणारे फेरीवाले व विविध बाजारपेठांमध्ये महापालिकेने बांधून दिलेल्या ओटय़ांवर व उघडय़ा जागेवर व्यवसाय करणाऱ्यांकडून ठराविक किमतीत बाजार पासेसव्दारे (शुल्क चिठ्ठी) वसुली करून महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्यात येते. अलीकडे हे शुल्क घेण्याचे बंद करण्यात आले असून ते वाढविण्याचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीच्या बैठकीत आला आहे. मात्र, त्याला मंजुरी देण्यात आली नाही. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक विक्रेत्यांकडून २ रुपये रोजप्रमाणे शुल्क घेतले जात होते. आता ते १० रुपये करण्यात येणार आहे.
नागपुरात अधिकृत नोंदणी केलेले १६०० च्या जवळपास फेरीवाले, भाजीविक्रेत्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात मात्र ही संख्या दोन हजारच्या घरात असताना त्यांची नोंद मात्र महापालिकेच्या बाजार विभागाकडे नाही.
महापालिकेच्या मालकीच्या स्थायी दुकानांपासून मिळणारे भाडे हे या विभागाचे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. याशिवाय आठवडी बाजार व दैनंदिन बाजारातील दुकानांपासून पासेसद्वारे येणारी तसेच नोंदणीकृत सायकल रिक्षांचा कर व इतर किरकोळ स्वरुपाचे उत्पन्न हे या विभागाची दुय्यम स्वरुपाच्या उत्पन्नाची साधने आहेत. या व्यतिरिक्त शहरातील वर्दळीच्या व बाजारपेठांच्या परिसरात नागरिकांना त्यांची वाहने ठेवण्यास सोय व्हावी या दृष्टीने महापालिकेच्या मालकीच्या जागांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
या ठिकाणीच्या व्यवस्थेसाठी व्यावसायिकांकडून निविदा मागवून वार्षिक व दैनंदिन भाडय़ावर सिव्हिल कार्यालय, महात्मा फुले बाजार इमारत व बाजार परिसर, सदर रोग निदान केंद्र, मंगळवारी बाजार सदर, नेताजी मार्केट बर्डी, सोमवारी क्वॉर्टर्स, बुधवारी आठवडी बाजार, सीताबर्डी सुपर मार्केट जागेत, राजविलास टॉकिजसमोर, महाल कार्यालय, एस.टी. स्टँड समोर, गोकुळपेठ बाजार, केळीबाग रोड, बिग बाजार सीताबर्डी इत्यादी पार्किंग स्टँड सध्या देण्यात आले असून त्यांच्यापासून देणाऱ्या भाडय़ाची वसुली करून महापालिकेच्या खजिन्यात भर टाकण्याचे काम हा विभाग करतो. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था करामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली असताना बाजारशुल्कातून मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो. मात्र, त्यासाठी महापालिकेने सोयी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.