महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासंदर्भात माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून जुन्या योजना कायम ठेवत काही नवीन योजना राबविण्याचा संकल्प अर्थसंकल्पात करण्यात आला असून कोणत्याही स्वरुपाची थेट करवाढ न करता सामान्यांना दिलासा देण्यासाठी घोषणांचा वर्षांव करीत महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता १४०१.३७ कोटीचा अर्थसंकल्प स्थायी समिती समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी सभागृहात सादर केला. उत्पन्न वाढीसाठी कर लादण्यात आले नसले तरी रेडिरेकनरचा बोजा मात्र नागरिकांवर लादण्यात आला आहे. एलबीटी विरोधामुळे महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाले असले तरी त्या माध्यमातून अंदाजित ५४० कोटी रुपये उत्पन्न अर्थसंकल्पात ग्राह्य़ धरण्यात आले आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाकडून ५४० कोटी , मालमत्ता करापासून २२२ कोटी, पाणी करातून १५० कोटी, बाजारापासून ५२६ लाख, स्थावर विभागातून १३ कोटी, अग्निशामक विभागातून ११ कोटी, नगररचना विभागातून १०१ कोटी, आरोग्य विभागातून ४७८ लाख, लोककर्म विभाग ६० लाख, विद्युत विभाग ५१० लाख , हॉटमिक्स प्लांट विभाग ६१५ लाख, महसुली उत्पन्न ७६२८ लाख, इतर विभाग व महसूल ९९७ लाख, भांडवली अनुदानाद्वारे २६२ लाख आणि इतर बाबीपासून १५ कोटी असे १४०१. ३७ कोटी रुपयाचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात १०५ कोटीने वाढ झाली आहे. सुरूवातीची शिल्लक  २५.९४ कोटी रुपये अपेक्षित आहे. या आर्थिक वर्षांत सुरुवातीची अपेक्षित शिल्लक धरून एकूण उत्पन्न १४२७.३१ कोटी रुपये जमा होतील. हे अपेक्षित उत्पन्न गृहित धरून या आर्थिक वर्षांत १४२७ .१७ कोटी खर्च होईल आणि मार्च अखेर अपेक्षित शिल्लक १४.२२ कोटी रुपये राहणार असल्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पावर ४ जूनला महापालिकेच्या सभागृहात चर्चा होणार आहे. (संबंधित वृत्त पान ३)  
दृष्टिक्षेपात अर्थसंकल्प
*शिक्षण विभागात पुस्तक बँक योजना
*महापालिका शाळांमध्ये प्रथमोपचार पेटी
*सॅटेलाईट एज्युकेशन
*विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन
*वाठोडामध्ये मुंबईच्या धर्तीवर क्लब हाऊस व क्रीडा संकुलाची निर्मिती
*प्रभाग तेथे व्हॉलीबॉल मैदान
*सोमलवाडय़ात इनडोअर स्टेडियम
*चिंचभवनमध्ये प्रस्तावित थीम पार्क
*सार्वजानिक उद्यानासाठी पाणी शुद्धीकरण करून पुर्नवापर
*जाहिरात हक्क देऊन कॉर्नर उद्यान
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक
*अंबाझरी ओव्हर फ्लो येथे स्वामी विवेकानंदाचे स्मारक
*बीओटी प्रकल्पसाठी एक डेस्क योजना
*लोकसहभागातून रेडिओ मॅक्सी कॅब परिवहन योजना
*लहान पुलाद्वारे वसाहत जोडणी प्रकल्प
*बीओटी तत्वावर नागपुरात चित्रपट नगरी
*हैदराबादमधील हुसैन सागर तलावाच्या धर्तीवर गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण

Story img Loader