राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवून नगरीची प्रतिष्ठा वाढविणाऱ्या ‘सप्तका’स या पुरस्काराचा योग्य तो दर्जा राखत सन्मानित करून महापालिकेने गुरूवारी क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. विशेष म्हणजे त्यासाठी महापालिकेच्या सभेतील क्रीडा धोरणविषयक चर्चेची पाश्र्वभूमी निवडण्यात आल्याने या सन्मानाची शान अधिकच वाढली.
महापौर अॅड. यतिन वाघ यांनी महापालिकेचे क्रीडा धोरण आखण्यास सुरूवात करून आपण शहरातील विविध खेळांच्या तसेच खेळाडूंच्या विकासासाठी अनुकूल असल्याचा संदेश दिला होता. यादरम्यान जाहीर झालेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये शहरातील सात जणांची वर्णी लागली. त्यात ज्येष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भिष्मराज बाम यांना ‘जीवनगौरव’ तसेच क्रीडा मार्गदर्शक अशोक दुधारे, तलवारबाज स्नेहल विधाते, अजिंक्य दुधारे, क्रीडा संघटक आनंद खरे, नौकानयनपटूो वैशाली तांबे, ज्युदोपटू तुषार माळोदे यांचा समावेश आहे. या सर्व सात जणांच्या पुरस्काराने नाशिकचाही सन्मान वाढला. त्यामुळे त्यांच्या कार्याची महानगरपालिकेच्या वतीने योग्य दखल घेण्यात यावी असा सूर क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होऊ लागला.
महापौरांनीही त्यासंदर्भात अनुकूलता दर्शवित पालिकेच्या सभेदरम्यान या सप्तकाचा गौरव करण्याचे ठरविले. त्यानुसार गुरूवारच्या सभेत सर्व सात जणांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महापौरांनी प्रास्तविकात नाशिकच्या सात जणांना शिवछत्रपती पुरस्कार मिळणे ही नाशिककरांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचा उल्लेख केला. महापालिकेच्या सभेत क्रीडा धोरणाचा विषय चर्चेला असताना या पुरस्कार्थीचा सन्मान होणे हा दुग्धशर्करा योग असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, प्रशासन उपायुक्त हरिभाऊ फडोळ, सभागृह नेते शशिकांत जाधव, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, गुरूमित बग्गा आदींसह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त ‘सप्तक’ महापालिकेकडून सन्मानित
राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवून नगरीची प्रतिष्ठा वाढविणाऱ्या ‘सप्तका’स या पुरस्काराचा योग्य तो दर्जा राखत सन्मानित करून महापालिकेने गुरूवारी क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-02-2014 at 02:47 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmc shiv chhatrapati sports awards