नवी मुंबई पालिकेच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचना सीमांकन व आरक्षण हे अपारदर्शक आणि अन्यायकारक असल्याने ते नव्याने करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याच पक्षाचे एक सरचिटणीस सुधीर पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून २४ फेब्रुवारीला तिची पहिली सुनावणी आहे.
नवी मुंबई पालिकेची एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात पाचवी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने वाशी येथील भावे नाटय़गृहात १११ प्रभागांचे आरक्षण व रचना जाहीर केली आहे. सदर आरक्षण व रचना ह्य़ा कोणत्या निकषावर करण्यात आले आहेत. याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
प्रभाग रचना करताना महामार्ग, मुख्य रस्ते, रेल्वे मार्ग, नदी नाले, डोंगर, दऱ्या यांना पार करून करण्यात येणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असताना या ठिकाणी नाले, मुख्य रस्ते, यांना पार करण्यात आल्याचे दिसून येते. या संदर्भात काही प्रभागांची उदाहरणे देता येतील. ऐरोली येथील प्रभाग क्रमांक १३ची रचना करताना सेक्टर-४ चा भूभाग नाला व वर्दळीची ठिकाणे ओलांडून करण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक २१,२२ ची रचना चित्र विचित्र पद्धतीने करण्यात आली असून त्यात कोणत्याही भौगोलिक स्थितीचा अभ्यास करण्यात आलेला नाही.
रबाळे येथील प्रभाग क्रमांक २४ ची रचना करताना त्याची सुरुवात कोणत्या दिशेने करण्यात आलेली आहे हे स्पष्ट होत नाही. अशा प्रकारे २९, ३०, ३१, ३३, ३६, ४०, ४१, ४२, ४३, ४४, ४५, ४६, ४७,  ४८, ४९, ५३, ५५, ५७, ६६, ७२, ८१, ८९, ८८, ९०, ९१, ९२, ९३, १०६, १०९, १११ या प्रभागांच्या रचना सदोष आहेत. ही रचना पहिल्यांदाच गुगल मॅपद्वारे करण्यात आल्याने त्यात अनेक दोष आढळून आलेले आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षण एकाच वेळी न करता प्रभाग रचना करून त्यावर जनतेच्या हरकती आणि सूचना मागविणे आवश्यक होते. हे सोपस्कार पूर्ण न करता रचना आणि आरक्षण एकाच वेळी आटोपण्यात आले आहे. पूर्वीपेक्षा २२ प्रभाग वाढल्याने एका प्रभागाचे तीन तीन प्रभाग पडले आहेत. त्यात आरक्षणाचे निकष कसे लावण्यात आले आहेत. याबाबत स्पष्टीकरण नाही. त्यामुळे सदर रचना नव्याने करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Story img Loader