गेल्या चार वर्षांपासून नवी मुंबईकरांची डोकेदुखी ठरलेली भूमिगत जलवाहिन्या तसेच मलवाहिन्या टाकण्याची कामे पुढील आठवडाभरात पूर्ण होत आहेत. एकीकडे ही दिलासादायक बातमी पुढे येत असली तरी दुसरीकडे मात्र वसाहतींना जलवाहिन्यांची जोडणी देण्यासाठी अभियांत्रिकी विभाग शहरात येत्या काळात सुमारे नऊ हजार नवे खड्डे खोदणार आहे. नव्याने होणाऱ्या या खोदकामांमुळे यापूर्वीच शरपंजरी पडलेल्या रस्त्यांना डांबराचा मुलामा देणे पावसाळ्यापूर्वी तरी शक्य दिसत नाही. मोठय़ा रस्त्यांची कामे तर पावसाळ्यानंतरच हाती घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळाही नवी मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या शेकडो कोटींच्या अनुदानाचा वापर करत नवी मुंबई परिसरात अंतर्गत मल तसेच जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. नवी मुंबईची निर्मिती करताना सिडकोने वेगवेगळ्या उपनगरांमध्ये टाकलेल्या या वाहिन्या पूर्णपणे खराब झाल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने काढला होता. सिडकोच्या निकृष्ट झालेल्या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी वाढीव एफएसआय मंजुरीचा प्रस्तावही महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाली तर शहरातील पायाभूत सुविधांवर त्याचा ताण पडू नये, यासाठी अंतर्गत वाहिन्या टाकण्याची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली. साधारण तीन ते चार वर्षांपूर्वी ही कामे सुरू करण्यात आली. १८ महिन्यांच्या कालावधीत ही कामे पूर्ण करावीत, अशी अट कंत्राटदारांपुढे ठेवण्यात आली होती. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे या कामांना सतत मुदतवाढ दिली गेली. या काळात अंतर्गत वाहिन्या टाकण्यासाठी शहरातील जवळपास सर्व रस्ते खोदण्यात आले. खोदलेल्या रस्त्यांची भरणी केल्यावर त्यावर डांबराचा मुलामा चढविण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले होते. मात्र खड्डय़ांची भरणीच मुळात सदोष असल्यामुळे गेल्या तीन वर्षांत नवी मुंबईकरांना अर्धवट अवस्थेत असलेल्या या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यांवर पाण्याची डबकी साचत असल्याचे चित्र दिसते.
यावर्षीही त्रास कायम
येत्या पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करून नवी मुंबईकरांचा त्रास कमी केला जाईल, असा दावा मध्यंतरी महापालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांनी केला होता. मात्र धोरणलकव्याने ग्रासलेल्या महापालिकेला येत्या १५ दिवसांत हे शक्य होईल, असे दिसत नाही. राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू विकास योजनेची कामे वेगाने सुरू आहेत. जलवाहिन्या तसेच मलवाहिन्या टाकण्याची कामे अंतिम टप्प्यात असून काही उपनगरांमध्ये ती पूर्णही झाली आहेत. असे असले तरी अंतर्गत जलवाहिन्यांच्या वसाहतीपर्यंत नव्या जोडण्या देण्याची कामे मोठय़ा प्रमाणावर शिल्लक असून त्यासाठी येत्या काळात सुमारे नऊ हजार खड्डे खोदावे लागणार आहेत. अशा प्रकारे २७ हजार जोडण्या देण्याची कामे गेल्या १५ दिवसांपासून सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी नऊ हजार जोडण्यांची कामे अद्याप शिल्लक आहेत, असा दावा महापालिकेचे अतिरिक्त अभियंता सुरेंद्र पाटील यांनी केला.
खड्डय़ांमुळे रस्त्यांची कामे अर्धवट
दरम्यान, नव्याने खोदण्यात येणाऱ्या नऊ हजार खड्डय़ांमुळे नव्या रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर करण्याशिवाय पर्याय नाही, असे चित्र दिसू लागले आहे. वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरुळ अशा काही उपनगरांमध्ये रस्त्यांचे तात्पुरते डांबरीकरण करण्याची कामे हाती घेण्यात आली असली तरी अंतर्गत पावसाळ्यापूर्वी महत्त्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण होतील का, याविषयी शंकेचे वातावरण आहे. जलवाहिन्यांच्या जोडण्यांसाठी नऊ हजार खड्डे खोदावे लागणार असल्यामुळे रस्त्यांची कायमस्वरूपी कामे करण्यासाठी पावसाळ्यानंतरचा मुहूर्त शोधावा लागेल, असे सध्याचे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा