शासकीय नियम धाब्यावर बसवून नवी मुंबई पालिकेने बेलापूर येथे बांधलेल्या आलिशान मुख्यालयात आता नवनवीन समस्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली असून गुरुवारपासून स्थलांतरित होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दुपारच्या जेवनाचा डबा खायचा कुठे, असा प्रश्न पडला आहे. हे संपूर्ण मुख्यालय मध्यवर्ती वातानुकूल असल्याने कर्मचारी अधिकाऱ्यांनी जेवन स्वत:च्या कार्यालयात खाल्ल्यास त्याचा सुंगध किंवा दुर्गध सर्वत्र पसरण्याची भीती अभियंता विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या कॅन्टीनमध्ये डबे खाण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी अधिकाऱ्यांच्यात नाराजी पसरली आहे.
नवी मुंबई पालिकेने १७० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या बेलापूर सेक्टर ५० अ येथील आलिशान मुख्यालयाचे कामकाज गुरुवार सुरू झाले आहे.
त्यासंर्दभात आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी काही बैठका घेऊन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अधिकाऱ्यांना दालन वाटपाचे अधिकार आयुक्तांनी स्वत:कडे ठेवले आहेत. पाच मजली असणाऱ्या या मुख्यालयाची रचना थोडीफार संसद भवनासारखी आहे. त्यामुळे संपूर्ण इमारतीला एक फेरा मारतानाही काही जणांच्या नाकीनऊ येणार आहे.
इमारत वातानुकूलित आणि इको असल्याने सूर्यप्रकाश जास्तीत जास्त आत येण्याची तजवीज करण्यात आली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये खाण्याच्या कोणत्याही पदार्थाला कार्यालयात परवानगी नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणीही अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या दुपारच्या जेवनाचा डबा किंवा बाहेरील अन्नपदार्थ टेबलावर उघडून खाता येणार नाही.  त्यासाठी कॅन्टीनचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे कांदा-मुळा-भाजी खाणाऱ्या अधिकाऱ्यांचीही पंचाईत झाली आहे. टाकून दिलेले अन्न सडल्यास त्याची दरुगधी संपूर्ण मुख्यालयात पसरण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. शासकीय इमारत बांधताना शेवटच्या गरीब दुबळ्या नागरिकाचा विचार केला जातो. तो विचारही आलिशान इमारत उभारताना केला न गेल्याने अनेक अडचणी भविष्यात उभ्या राहणार असल्याचे दिसून येते.
या भव्य इमारतीत एखाद्या गरीब दीनदुबळ्या नागरिकाला पाय ठेवताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे. ही इमारत एका पंचतारांकित हॉटेल्ससारखी दिसत असल्याची प्रतिक्रिया दस्तुरखुद्द उद्घाटक शरद पवार यांनी नोंदविली आहे.
त्यात आता या इमारतीत प्रवेश करण्याच्या वेळा निश्चित केल्या गेल्या असून संध्याकाळी ३ ते ५ या वेळेत केवळ नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी अद्ययावत प्रवेश यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जुन्या इमारतीत आओ जावो घर तुम्हारा असल्याने सकाळपासूनच ठेकेदारांचा इमारतीला गराडा पडल्याचे दिसून येत होते.

Story img Loader