संपूर्ण जून महिना सुट्टीवर गेलेल्या पावसाने जुलै महिन्यात चार दिवस शहरात बऱ्यापैकी हजेरी लावल्याची नोंद असून पावसाळी गटारे व कल्व्हर्टची कामे केल्याने या पावसात शहरात पाणी साचले नसल्याची पाठ पालिका प्रशासनाने थोपटून घेतली आहे. शहरात १९ ठिकाणी ही मान्सूनपूर्व कामे केल्याने पाणी साचले नसल्याचा दावा पालिकेने एका पत्रकाद्वारे केला आहे. अतिपावसात पाण्याखाली जाण्याची परंपरा यावर्षी तेथे पालिकेने केलेल्या गटार व कल्व्हर्टमुळे खंडित होणार असल्याचे दिसून येते.
नवी मुंबई हे भौगोलिकदृष्टय़ा खाडी व डोंगर यांच्यामध्ये वसविण्यात आलेले शहर आहे. त्यामुळे पावसात खाडीतील भरतीचे आणि डोंगरातील कडय़ाकपारीतून येणाऱ्या पाण्यामुळे शहर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिडकोने या पाण्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी उघाडी पद्धतीचे पॉण्ड खाडीकिनाऱ्यांवर बांधले आहेत. त्यामुळे भरतीचे पाणी थेट शहरात घुसू शकत नाही. त्याचबरोबर डोंगरातील पाणी थेट खाडीत जाण्यासाठी पावसाळी नाले उभारले आहेत. या सर्व सुविधांचे नियोजन करण्याची जबाबदारी पालिकेची आहे मात्र मागील काही वर्षांपासून एमआयडीसी शहरातील अनियोजनबद्ध विकासामुळे पाणी साचण्याच्या घटना घडू लागल्या होत्या.
पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्यावर भर दिला. त्यात बेलापूर, नेरुळ, तुर्भे, कोपरखैरणे, ऐरोली या भागांत १९ ठिकाणी पावसाळी गटारे व कल्व्हर्टची कामे करण्यात आलेली आहेत. याशिवाय ऐरोली, रबाले, घणसोली, कोपरखैरणे या रेल्वे स्टेशनजवळील अंडरपासमध्ये पाणी तुंबणाऱ्या समस्येवर उपाययोजना केली आहे. या ठिकाणी स्वयंचलित पाणी उपसापंप लावण्यात आले असून अंडरपासमध्ये पाण्याची पातळी वाढल्यानंतर लागलीच हे पंप सुरू होऊन पाणी बाहेर फेकले जाणार आहे. १, २, ७ आणि ९ जुलै रोजी पडलेल्या संततधार पावसात या भागात पाणी साचले नसल्याचा दावा पालिकेने केलेला आहे, पण हा दावा करताना पालिका प्रशासनाची घाई झाल्याचे दिसून येत आहे. अद्याप म्हणावा तसा पाऊस पडलेला नसताना असे दावे करण्याची घाई प्रशासनाला का झाली आहे, याचे मात्र उत्तर कोणत्याही अधिकाऱ्याला देता आले नाही.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा