शहर विद्रूपीकरणाला हातभार लावणाऱ्या पोस्टरबाजीला लगाम घालण्यासाठी परवानगी घेऊन लावण्यात येणाऱ्या होर्डिग्जकरिता नवी मुंबई पालिका शहरातील मोक्याच्या जागा निश्चित करणार असून त्यांची यादी पालिकेच्या वेबसाइटवर टाकली जाणार आहे. या जागांव्यतिरिक्त आढळणारे पोस्टर, बॅनर, होर्डिग्ज हे बेकायदेशीर ठरविले जाणार आहेत. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या सक्त आदेशानंतरही शहरात राजकीय पोस्टर गायब झाले असले तरी अनेक ठिकाणी आजही संस्था, व्यक्ती, व्यावसायिक यांची बेकायदेशीर होर्डिग्ज झळकत आहेत.
विनापरवानगी शहरात लागणाऱ्या होर्डिग्जच्या बेबंदशाहीला चाप बसावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पालिका बरखास्तीचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी विनापरवानगी होर्डिग्जवर कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. नवी मुंबईत ही कारवाई झाली आहे, पण ती पुरेशी नसून काही सामाजिक संस्था, वाढदिवस साजरे करणारे भाई, दादा, धार्मिक सण साजरे करणाऱ्या धार्मिक संस्था, कामगार संघटना यांचे होर्डिग्ज शहर व एमआयडीसी भागात दिमाखात झळकत आहेत. पालिकेचे आलिशान मुख्यालय असलेल्या बेलापूर येथील चौकात आग्रोलीच्या शिवशंकर क्रीडा मंडळाचा नगरसेविका क्रिकेट चषकाचा फलक लावण्यात आला आहे. यावर शिवसेनेच्या छोटय़ामोठय़ा सर्व नेत्यांची छायाचित्रे आहेत. ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर तर होर्डिग्ज स्पर्धा आजही कायम असून काही सामाजिक संस्थांना स्थानकाचे कुंपण आंदण देण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे राजकीय होर्डिग्ज या ठिकाणाहून गायब झाले असले तरी सामाजिक व धार्मिक संस्थांचे होर्डिग्ज झळकत आहेत. यात राजकीय मंडळींचा शिरकाव आहे. याच ठिकाणच्या बसडेपोची जाळीदेखील याच कामासाठी वापरली जात आहे.
नगरसेवक एम. के. मढवी यांनी लावलेले फी-माफीचे होर्डिग्ज रीतसर परवानगी घेऊन लावले आहेत, असे त्यांनी सांगितले. साईनिधी हॉटेलसमोरील चौकातील कायमस्वरूपी होर्डिग्जला शेजारच्या सोसायटीने परवानगी दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले; मात्र सोसायटी अशा प्रकारे जाहिरातींची परवानगी देऊ शकत नाही, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
प्रभाग अधिकारी पालिका निवडणुकीच्या कामात व्यस्त झाल्याने त्यांना हे होर्डिग्ज काढायला वेळ मिळत नाही, अशी सबब एका अधिकाऱ्याने सांगितली. गावागावात अशा होर्डिग्जचा अक्षरश: सुळसुळाट झाला असून बारशापासून बाराव्यापर्यंत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे होर्डिग्ज लावण्याची जणू काही अहमिका सुरू आहे.
 मात्र मुंबई उच्च न्यायालयाचा या चमकेशबहाद्दरांना दट्टय़ा मिळाल्यानंतरही हे होर्डिग्ज लावण्याचे प्रमाण कमी होत नाही. पालिकेचे प्रभाग अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हे प्रमाण वाढले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील सर्व विनापरवाना होर्डिग्ज हटविण्याचे लेखी आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले असून यानंतर लवकरच परवानगी घेऊन होर्डिग्ज लावण्यासाठीही जागा निश्चित केल्या जाणार आहेत. त्याची एक यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्याव्यतिरिक्त होर्डिग्ज लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. याशिवाय विनापरवानगी होर्डिग्ज लावणाऱ्यांची माहिती देण्यासाठी टोल फ्री नंबर घेण्यात येणार असून महानगर टेलिफोन निगमकडे त्याची मागणी करण्यात आली आहे.
-आबासाहेब जऱ्हाड, आयुक्त, नवी मुंबई पालिका