नवी मुंबई पालिका निवडणुकीपर्यंत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रोखून धरलेली नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) भाडेवाढ या महिन्यात अटळ असून कमीत कमी दोन रुपये भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने या भाडेवाढीला गतवर्षी मान्यता दिली आहे, पण पुन्हा प्राधिकरणाची परवानगी घेऊन ही भाडेवाढ करावी लागणार आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे या भाडेवाढीला आता नव्याने येणाऱ्या नगरसेवकांच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार आहे. एमएमआरडी क्षेत्रातील सर्व परिवहन उपक्रमांचे कमीत कमी भाडे सात रुपये असून केवळ एनएमएमटीचे भाडे पाच रुपये आहे. उपक्रमांचा तोटा दिवसेंदिवस वाढत असून तो आता प्रति महिना अडीच कोटी रुपयांच्या घरात गेला आहे.
वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, वाहनांचे सुटे भाग, टायर, आस्थापनावरील वाढता खर्च यामुळे एनएमएमटीची भाडेवाढ करण्याशिवाय प्रशासनापुढे दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. कालपरवापर्यंत असलेला नवी मुंबई पालिकेच्या परिवहन सेवेचा दोन कोटी रुपयांचा तोटा आता आवाक्याबाहेर जाऊ लागला असून इतर उत्पन्नाच्या साधनांनी भरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे महिन्याला तीन कोटी रुपये असणारा तोटा आता कमी करून अडीच कोटींवर आणण्यात आला आहे. तरीही आस्थापनावर दरवर्षी द्यावी लागणारी पगारवाढ व इतर भत्त्यामुळे हा तोटा अधिक कमी करणे प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने आता हात टेकले असून भाडेवाढ करण्याची सहमती द्या, अशी विनंती नगरसेवकांना केली आहे.
आतापर्यंत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा, विधानसभा आणि आता पालिका निवडणुकीपर्यंत ही दरवाढ रोखून धरली होती. भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन समितीने दोन वेळा महासभेपुढे ठेवला, पण नगरसेवकांची संमती न मिळाल्याने ही दरवाढ करता आली नाही. या दरवाढीसाठी लागणाऱ्या शासनाच्या परिवहन प्राधिकरणाची यापूर्वी मंजुरी घेण्यात आली आहे. एनएमएमटीचा प्रस्ताव योग्य वाटल्याने प्राधिकरणाने गतवर्षी ही मंजुरी दिली होती, पण त्याला महासभेने मान्यता न दिल्याने ती मंजुरी कालबाहय़ ठरली आहे. त्यामुळे उपक्रम प्रशासनाला प्राधिकरणाची पुन्हा एकदा परवानगी मागावी लागणार आहे. त्यासाठी उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड मंगळवारी प्राधिकरणाकडे पुन्हा विनंती अर्ज दाखल करणार आहेत. भाडेवाढ न केल्यास उपक्रम डबघाईला जाण्याची भीती समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी एनएमएमटी कमीत कमी दोन रुपये भाडेवाढ करण्याची शक्यता आहे. पालिकेत ९ मे रोजी महापौर, उपमहापौर निवडणूक आटोपल्यानंतर याच महिन्यात स्थगित सभा होणार असून त्यात हा भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. उपक्रमात ३६० बसेस असून त्या विविध ४८ मार्गावर धावत आहेत. आजूबाजूच्या उपक्रमांपेक्षा एनएमएमटीचा तिकीट दर कमी आहे. बेस्टचा पहिल्या टप्प्यासाठी ९ रुपये तिकीट दर आहे, तर एनएमएमटीचा तो ५ रुपये आहे. या भाडेवाढीनंतर टीएमटीच्या बरोबरीची ही भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.  या भाडेवाढीमुळे एनएमएमटीच्या तिजोरीत ५ ते ६ लाख रुपयांचा भरणा प्रतिदिन पडू शकणार आहे. त्यामुळे एनएमएमटीची घसरलेली गाडी रुळावर येणार आहे. ही भाडेवाढ आता अपरिहार्य झाल्याचे प्रशासनाचे मत आहे.

वाढती महागाई आणि समितीने सादर केलेल्या प्रस्तावाला प्राधिकरणाने गतवर्षी हिरवा कंदील दाखविला होता, पण तो प्रस्ताव महासभेने स्थगित ठेवला आहे. तो स्थगिती प्रस्ताव महासभेत सादर करण्याची प्राधिकरणाकडे पुन्हा परवानगी मागावी, की जुन्या परवानगीनुसार प्रस्ताव सादर करावा, याची विचारणा प्राधिकरणाकडे केली जाणार आहे. ती मिळाल्यानंतर महासभेत प्रस्ताव ठेवला जाईल अन्यथा परिवहन समिती, महासभा आणि प्राधिकरण असा पुन्हा प्रवास करावा लागेल, पण आता भाडेवाढीशिवाय प्रशासनापुढे दुसरा पर्याय नाही. आजूबाजूच्या सर्व परिवहन उपक्रमांचा तिकीट दर एनएमएमटीपेक्षा जास्त आहे.
शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी

Story img Loader