खारघर टोलचा प्रवाशांवर भार
तोटय़ात जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन समितीच्या बसगाडय़ांना खारघर टोलची घरघर लागली आहे. या टोलनाक्यामुळे सुमारे साडेतीन लाखांचा भरुदड एनएमएमटी प्रशासनाला भरावा लागणार आहे. हा भरुदड एनएमएमटीने भरल्यास त्याची झळ प्रवाशांच्या खिशाला लागणार आणि पनवेलच्या स्थानिक म्हणविणाऱ्या एनएमएमटी प्रवाशांना दोन रुपयांची तिकीटवाढ होणे अटळ आहे. सरकारच्या स्थानिकांच्या व्याख्येत पनवेलचे प्रवासी नसल्याची खंत प्रवासी वर्गातून होत आहे.
खारघर टोलनाका सुरू होण्याचे पडसाद तालुक्यातील विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडले आहेत. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या बसगाडय़ांना टोलधाडीचा फटका बसल्याने पालकांच्या खिशालाही झळ सोसावी लागणार आहे. एनएमएमटी प्रशासनाच्या बससेवेला याचा मोठा फटका बसणार आहे. पनवेल येथील आसूडगाव डेपोमधून सुमारे १०७ बसगाडय़ाांची वाहतूक या मार्गावर होते. या बसगाडय़ांना सुमारे महिन्याकाठी मासिक सवलत मिळाल्यानंतर साडेतीन लाख रुपयांची रक्कम टोलच्या माध्यमातून भरावी लागणार आहे. या टोलनाक्यातून एसटी महामंडळाच्या बसगाडय़ांना सूट देण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. तशी सूट एनएमएमटीच्या बस गाडय़ांना मिळावी अशी मागणी एनएमएमटीकडून होत आहे. सोमवारी एनएमएमटीच्या बसच्या वाहकाने टोल न भरल्यामुळे प्रवाशांसहित बस टोलनाक्याच्या शेजारी पंधरा मिनिटे उभी करण्यात आली.
या बसमधील प्रवाशांनी याविषयी संताप व्यक्त केला. खारघर टोलनाक्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना कोंडीचा फटका जाणवतो. टोलची रक्कम भरूनही वाहतूक कोंडीत वेळ व इंधन वाया जात असल्याने ही कोंडी वाहनचालकांच्या मुळावर बसणारी ठरली आहे. मात्र काही वेळा हीच कोंडी एनएमएमटीच्या बससाठी टोलधाडीतून निसटण्याची संधी बनली आहे.
वाहनांच्या मोठय़ा संख्येमुळे टोलनाक्यावरील कर्मचारी एनएमएमटी वाहनचालकांशी हुज्जत घालण्याऐवजी एनएमएमटी बस सोडून देतात. गर्दीच्या वेळी कामी आलेली युक्ती रस्ता मोकळा असताना मात्र एनएमएमटी चालकांच्या अंगलट येते. वाहने कमी असल्याने टोल वसूल करणारे कर्मचारी एनएमएमटीची बस थांबवून त्यांना अधिसूचनेवरील नियम दाखवतात. त्यामुळे येथे अनेकदा शाब्दिक चकमक होते.
एनएमएमटीचा बस डेपो आसूडगावमध्ये असल्याने आम्ही स्थानिक नव्हे का, असा प्रश्न चालकांकडून विचारला जातो. तसेच पनवेल तालुक्यामधील विविध सिडको वसाहतींमधील रहिवासीच आमचे प्रवासी असल्याने स्थानिकांच्या व्याख्येत एनएमएमटीचे प्रवासी का मोडले जात नाहीत, असा प्रश्न प्रवासी विचारतात.
स्थानिकांच्या व्याख्येची व्याप्ती कोण करणार, असा प्रश्न एनएमएमटीचे प्रवासी, चालक, वाहकांना पडला आहे. एनएमएमटीला तिकीटदरात वाढ करण्यासाठी प्रस्ताव, ठराव, महासभेची मंजुरी असे नियम पार करावे लागणार आहेत. त्यामुळे तूर्तास तिकीटवाढ होणे शक्य नसले तरीही भाडेवाढ अटळ मानली जाते.
– संतोष सावंत, पनवेल</p>