मुंबईतील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विमानतळावर रात्री-अपरात्री उतरणाऱ्या प्रवाशांना सुखरूप घरपोच जाता यावे, यासाठी बेस्टने सुरू केलेल्या सीबीडी-विमानतळ सेवेनंतर नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) स्वातंत्रदिनाच्या शुभमुहूर्तावर शुक्रवारपासून बेलापूर ते विमानतळ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी व्होल्वोच्या तीस नवीन बसेस एनएमएमटीच्या ताफ्यात आलेल्या आहेत. याशिवाय शहरातील वाहतूक सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने एनएमएमटी आणखी आठ विविध मार्ग सुरू करणार आहे. यात एमआयडीसीत कामनिमित्ताने जाणाऱ्या कामगारांसाठी तीन मार्ग मोठे दिलासा देणारे ठरणार आहेत.
नवी मुंबईत सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी पालिकेने १८ वर्षांपूर्वी एनएमएमटी सेवा सुरू केली आहे. या सेवेत आतापर्यंत ३३६ बसेस असून त्या विविध ३७ मार्गावर प्रवाशी सेवा करीत आहेत. शुक्रवारी स्वातंत्रदिनाच्या शुभ मुहूर्तावर ३० व्होल्वो व टाटाच्या १० अशा ४० नवीन बसेस डेरेदाखल होत असल्याचे एनएमएमटी व्यवस्थापक शिरीश आरदवाड यांनी सांगितले. त्यामुळे एनएमएमटीची प्रवाशी सेवा क्षमता वाढणार असल्याने या बसेसच्या बळावर एनएमएमटीने नवीन नऊ मार्ग सुरू करण्याचे ठरविले असून त्यातील बेलापूर ते दोन्ही विमानतळांवर धावणारी १०१ व १०४ या दोन क्रमांकाच्या बसेस महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या बसेस २५ मिनिटांच्या फरकाने धावणार आहेत. याशिवाय तुर्भे येथील एपीएमसी घाऊक बाजारात मुंबईतील व्यापाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन एपीएमसी ते लोखंडवाला कॉम्पलेक्स दरम्यान १३३ क्रमांकाची बस धावणार आहे. त्यानंतर रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता जुईनगर ते एमआयडीसी भागात फिरून येणाऱ्या मार्गावर ३६ क्रमांकाची बस सुरू केली जाणार आहे.
रबाले एमआयडीसीत लघु उद्योजकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे कामगारही जास्त असल्याने रबाले रेल्वे स्थानक ते अल्फा लेवल कंपनीदरम्यान दर १२ मिनिटांनी सहा क्रमांकाची बस फिरवली जाणार आहे. ऐरोली औद्योगिक नगरीत काम करणारे कामगार अलीकडे ठाण्यापेक्षा नाहूर या रेल्वे स्थानकाला अधिक पसंती देत असल्याने रिलायबल ते नाहूर रेल्वे स्थानकांदरम्यान १०९ क्रमांकाची बस शुक्रवारपासून धावणार आहे. याशिवाय घणसोली, कोपरखैरणे रेल्वे स्थानकांना जवळ ठरणारी १३ व १४ क्रमांकाची नवीन बस मार्ग सुरू केला जाणार आहे.
या सर्व बसेसमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि लोकपयोगी होईल असा विश्वास आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेएनएनआरयूएम दिलेल्या ११० कोटी रुपयांच्या अनुदानावर एनएमएमटीने १८५ नवीन बसेस घेणार आहे. त्यातील ४० बसेस एनएमएमटीच्या ताफ्यात येत असून ३० बसेस व्होल्वो या जगातील बसेस उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या कंपनीच्या आहेत तर दहा टाटाच्या आहेत. वातानुकूलित नसणाऱ्या बसेस या रिंग रुट मार्गावर फिरवल्या जाणार आहेत. जुन्या बसेस खिळखिळ्या होत असल्याने एनएमएमटीच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने नवीन बसेस येणार आहेत.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmmt bus will run on mumbai airport to belapur