नवी मुंबई महापालिकेने अस्थापनेवरील सुमारे २७०० कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना इतर महापालिकांच्या तुलनेत घसघशीत दिवाळी भेट दिल्यानंतर महापालिका परिवहन उपक्रमानेही (एनएमएमटी) एक पाऊल पुढे टाकत आपल्या कर्मचाऱ्यांना १२ हजार ३०० रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरित केले आहे. एनएमएमटीच्या बसेस चालविणाऱ्या रोजंदारी वाहक तसेच चालकांनाही महिन्याला कमीत कमी ५०० रुपये याप्रमाणे दिवाळी भेट देण्यात येणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही पाच ते सहा हजारांच्या घरात दिवाळी भेट मिळणार आहे. यामुळे उपक्रमावर सुमारे दोन कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडेल, अशी माहिती एनएमएमटीचे लेखाधिकारी जयवंत दळवी यांनी वृत्तान्तला दिली.
‘बेस्ट’सारख्या तगडय़ा परिवहन उपक्रमाशी स्पर्धा करीत मुंबई शहरात वेगवेगळ्या मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरू करणाऱ्या नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाला दररोज चार लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून महिन्याकाठी हा आकडा सव्वा कोटी रुपयांचा पल्ला ओलांडत असल्याने जमा-खर्चाचे गणित जुळविताना व्यवस्थापनाच्या अक्षरश: नाकीनऊ येऊ लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आल्याने हा तोटा आणखी वाढला आहे. एनएमएमटीच्या ताफ्यात सध्या ३५० हून अधिक बसेस आहेत. यापैकी ४४ बसेस दुरुस्तीच्या कारणास्तव बस आगारांमध्ये उभ्या आहेत. तर १२० बसेस या कर्मचारी नाहीत म्हणून आगारांमध्ये उभ्या असतात. या बसेस आगाराबाहेर पडाव्यात यासाठी एनएमएमटी व्यवस्थापनाने मध्यंतरी आखलेले कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धोरणही पुरते फसले आहे. या पाश्र्वभूमीवर तोटय़ाचा आकडा प्रत्येक वर्षी वाढत असल्याने एनएमएमटीने मध्यंतरी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. भाडेवाढीनंतरही तोटा फारसा कमी झालेला नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ही परिस्थिती पाहता एनएमएमटीतील कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळी भेट मिळेल किंवा नाही याविषयी महापालिका वर्तुळात साशंकतेचे वातावरण होते. मात्र नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदानासंबंधी जे धोरण लागू केले जाईल, तेच धोरण एनएमएमटीतील कर्मचाऱ्यांना लागू करावे, असा आग्रह पालकमंत्री गणेश नाईक यांनी धरला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2012 रोजी प्रकाशित
एनएमएमटीतील कर्मचाऱ्यांना १२ हजार ३०० रुपयांचे सानुग्रह अनुदान
नवी मुंबई महापालिकेने अस्थापनेवरील सुमारे २७०० कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना इतर महापालिकांच्या तुलनेत घसघशीत दिवाळी भेट दिल्यानंतर महापालिका परिवहन उपक्रमानेही (एनएमएमटी) एक पाऊल पुढे टाकत आपल्या कर्मचाऱ्यांना १२ हजार ३०० रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरित केले आहे.

First published on: 13-11-2012 at 05:12 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmmt worker gets 12300 rupess donation