मेडिकल प्रशासनाच्या भूमिकेने नातेवाईक संतप्त
शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील वाॉर्ड क्रमांक ५ मध्ये जन्म होऊन दोन दिवस होत नाही तोच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर रुग्णालयातील प्रशासनाने मात्र या प्रकरणाबाबत कुठलीच तक्रार नसल्याची भूमिका घेत कारवाईचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकरणातील संबंधित डॉक्टरांना मेडिकल प्रशासन पाठिशी घालत असल्याचे बाळाच्या नातेवाईकांनी म्हटले
आहे.
शांतीनगर कॉलनीमधील संगिता मंगेश तिवाडे या गर्भवती महिलेने डागा रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे आई आणि बाळाला शासकीय रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ दाखल करण्यात आले होते. बाळामध्ये ऑक्सिजनची कमी असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला ऑक्सिजन लावले मात्र त्यानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा होत नसल्याचे दिसताच अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. मात्र बाळाच्या वडील मंगेश तिवाडे यांनी बाळाला ऑक्सिजन देण्यात आले नसल्यामुळे दगावल्याचा आरोप बाळाचे वडील मंगेश तिवाडे यांनी केला होता.
रुग्णालयात नातेवाईकांनी सोमवारी मध्यरात्री गोंधळ घातला. या प्रकरणाची रुग्णालयातील प्रशासनाने गंभीर दखल घेत बुधवारी अधिष्ठाता आणि वैद्यकीय संचालकानी बालरोग विभागाची बैठक घेऊन त्या संदर्भात चौकशी केली.
संबंधित डॉक्टर आणि परिचारिकांशी चर्चा करून बाळाच्या आरोग्यबाबतचा अहवाल बघितला. या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांनी सांगितले, ज्यावेळी बाळाला डागा रुग्णालयातून आणण्यात आले त्याचवेळी त्यांची प्रकृती गंभीर होती. त्याला ‘बर्थ अॅक्सफायजिया’ होता त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी संबंधीत वरिष्ठ आणि निवासी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. वॉर्डामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था होती. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात येऊन व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले मात्र आधीच क्रिटिकल अवस्थेत आणल्यामुळे त्याचा वाचवणे शक्य झाले नाही. या संदर्भात बाळाच्या नातेवाईकांकडून कुठलीच लेखी तक्रार आली नाही.
बालरोग विभागात सर्व अत्याधुनिक सेवा उपलब्ध असल्यामुळे सर्व प्रयत्न करण्यात आले त्यामुळे डॉक्टर आणि प्रशासनाकडून कुठलाच हलगर्जीपणा झाला नसल्याचे डॉ. पावडे यांनी
सांगितले.
बाळाच्या मृत्यूबाबत कोणावरही कारवाई नाही
शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील वाॉर्ड क्रमांक ५ मध्ये जन्म होऊन दोन दिवस होत नाही तोच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर रुग्णालयातील प्रशासनाने मात्र या प्रकरणाबाबत कुठलीच तक्रार नसल्याची भूमिका घेत कारवाईचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकरणातील संबंधित डॉक्टरांना मेडिकल प्रशासन पाठिशी घालत असल्याचे बाळाच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.
First published on: 31-01-2013 at 02:43 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No action on anyone for child died