दिल्लीपासून अगदी गल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता असूनही पनवेल शहराचा कायापालट करण्याची किमया अजूनही आमदार प्रशांत ठाकूर यांना साधता आली नसून या शहराच्या पल्याड आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी होत असताना पनवेल शहरात मात्र विकासाची गंगा कधी अवतरणार, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. जागोजागी पडलेले खड्डे, सर्वत्र पसरलेले धुळीचे साम्राज्य, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, नियोजनाच्या आघाडीवर आलेले अपयश यामुळे पनवेल शहराची अवस्था दयनीय बनली असून अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या आमदार महाशयांना शहराचा चेहरा अजूनही बदलता आलेला नाही. पनवेल नगरपालिकेतील यशामुळे आमदार ठाकूर यांची राजकीय घोडदौड सुरू झाली. त्यामुळे नगरपालिकेची सत्ता आणि आमदारपदाची लॉटरी लागल्यावर शहराच्या पायाभूत गरजा ठाकूर भागवतील अशी सामान्य पनवेलकरांची अपेक्षा होती. मात्र, सध्याचे चित्र नेमके उलट असल्याचे दिसत आहे.
शहरातील रस्त्याची रडतखडत सुरू असलेली कामे, गटारांची अर्धवट अवस्थेत झालेली बांधणी, शहरात सर्वत्र पसरलेले धुळीचे साम्राज्य यामुळे पनवेलकर अक्षरश: हैराण झाले आहेत. रस्त्याच्या कडेला घर असलेल्यांची सार्वजनिक कोंडी पनवेल नगरपालिकेच्या कारभारामुळे झाली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी प्रभुआळी येथील जलवाहिनीमध्ये कावळा आढळला. त्यामुळे नगरपालिकेच्या पाणी शुद्धीकरणाविषयीचे दावे फोल ठरले आहेत. जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यासंबंधी निवडणुकांपूर्वी वेगवेगळे दावे केले गेले. प्रत्यक्षात यासंबंधीचे धोरण अद्याप पनवेलकरांना समजू शकलेले नाही. शहरातील बावन बंगला परिसरातील ठाणा नाका ते पालिका मुख्यालयाकडे येणारा मार्ग हा पनवेलकरांसाठी जीवघेणा झाला आहे. या मार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य असून त्यामुळे प्रवाशांना मणक्याचे त्रास जाणवू लागले आहेत, असा दावा दादा अवघडे या रहिवाशांनी केला. शहरात पायाभूत सुविधांचे अक्षरश: तीनतेरा वाजले असून फेरीवाल्यांनी जागोजागी पदपथ अडविल्यामुळे अतिक्रमणाचे शहर अशी पनवेलची ओळख बनली आहे. महामार्गावर नव्याने उभ्या राहिलेल्या पुलामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल ही अपेक्षाही एव्हाना फोल ठरली आहे. नियोजन नावाची संकल्पनाच पनवेल परिसरात आढळून येत नाही. उद्याने, मैदानांच्या भूखंडावर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी असून या शहरालगत नव्याने वसलेल्या विभागांची अवस्थाही काही वेगळी नाही. खांदा कॉलनी, नवीन पनवेल यांसारख्या परिसरातही नागरी नियोजनाचा बोजवारा उडाला असून येथील नियोजन प्राधिकरण असलेल्या सिडकोवर कुणाचाच अंकुश नाही, असे चित्र आहे. ऊच्चशिक्षित असलेले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर या सगळ्या परिसराचा कायापालट करतील, अशी अपेक्षा पनवेलकरांना होती. मात्र, गेल्या चार वर्षांत आपल्या पदरी नेमके काय पडले, असा प्रश्न येथील नागरिकांना सतावू लागला आहे
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विकासाचा दावा
डिसेंबर २००९ मध्ये मला मतदारांनी विश्वासाने निवडून दिले. त्यानंतर राज्य सरकारच्या सहकार्यामुळे पनवेलमध्ये १०० खाटांचे रुग्णालय, न्यायालयाच्या नवीन इमारतींचा बांधण्याचा प्रश्न, तालुका क्रीडा संकुल असे अनेक प्रश्न मार्गी लावले. सिडको वसाहतींमधील मैदाने आणि फेरीवाल्यांच्या समस्येसाठी नवीन आलेल्या हॉकर्स धोरणामुळे हासुद्धा प्रश्न मार्गी लागला आहे. पनवेल शहरातील अनेक समस्या सोडविण्यात आलेल्या आहेत. यात आम्ही कुठे कमी पडलो असे वाटत नाही. विकासाच्या वाटेवरच शहराची वाटचाल सुरू असल्याचे आमदार ठाकूर यांनी सांगीतले.
पनवेलचे वाजले तीनतेरा
दिल्लीपासून अगदी गल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता असूनही पनवेल शहराचा कायापालट करण्याची किमया अजूनही आमदार प्रशांत ठाकूर यांना साधता आली
First published on: 11-02-2014 at 07:14 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No any development in panvel by mla