ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर यांसारख्या ठाणे जिल्हय़ातील प्रमुख शहरांमध्ये सोनसाखळी चोरांच्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागल्या असून दोन दिवसांपूर्वी चोरांनी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयातील प्रवेशद्वाराजवळ एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा केल्यामुळे पोलिसांच्या इभ्रतीचे तीनतेरा वाजले आहेत. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे ठाणे जिल्हय़ातील महिला वर्गात काहीसे घबराटीचे वातावरण पसरले असून ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे.
ठाण्याचे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी मध्यंतरी सोनसाखळी चोरांना पायबंद बसावा यासाठी कठोर उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यामुळे चोरांचा उपद्रव काहीसा कमी झाला होता. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा या चोरांचा धुमाकूळ सुरू  झाल्यामुळे महिला वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.  
नवी मुंबईत पोलीस सुस्तावले
नवी मुंबई पोलिसांच्या एकंदर कार्यपद्धतीविषयी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. खून, दरोडे, मारामाऱ्या यांसारखे प्रकार या शहरात वाढीस लागले असतानाच सोनसाखळी चोरीचे प्रकारही वाढू लागले आहेत. वाशी सेक्टर नऊ येथील फादर अग्नेल शाळेजवळील एका वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळून ५७ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेल्याच्या घटनेमुळे या भागात खळबळ उडाली आहे. वाशी पोलिसांची कामगिरी सातत्याने खालावली असून मोठय़ा चोऱ्या आणि दरोडय़ांचा छडा लावण्यात येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या अधिकाऱ्यांना यश येत नाही हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. असे असताना वाशी सेक्टर नऊ सारख्या गर्दीच्या वस्तीत चोरांची दहशत सुरू झाल्यामुळे वाशी पोलिसांची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सोनसाखळी चोरांना धाक निर्माण व्हावा, यासाठी महिलांनी उजवीकडून चालावे असा सल्ला देणारे फलक शहरभर लावून पाहिले. प्रत्यक्षात पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा धाक नसेल तर उपायुक्त कराड तरी काय करणार, अशी परिस्थीती नवी मुंबई परिसरात आहे.
ठाण्यात चोरटय़ांना भीती नाही
ठाण्यात मोक्का कायद्याचीही भीती सोनसाखळी चोरांना राहिलेली नसल्याचे दिसून येत आहे. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांचा बिमोड करण्यासाठी ठाणे पोलिसांनी मध्यंतरी आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविले होते. त्यासाठी खुद्द ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी रस्त्यावर उतरले होते. त्यामध्ये काही सोनसाखळी चोरटे पोलिसांच्या हाती लागले होते. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने कल्याणमधून सोनसाखळी चोरांची मोठी टोळी जेरबंद केली होती. मात्र, या मोहिमांनंतरही शहरामध्ये सोनसाखळी चोरटय़ांचा उपद्रव सुरूच होता. त्यामुळे सोनसाखळी चोरांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याचा ठाणे पोलिसांनी निर्णय घेतला होता. त्यानुसार, कारवाईही करण्यात आली. त्यामुळे शहरातील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांना काहीसा आळा बसल्याचे चित्र होते. मात्र, सोनसाखळी चोरटे पुन्हा शहरात सक्रिय होऊ लागल्याचे चित्र आहे. राबोडी भागात राहणाऱ्या लता कोळी या पतीसोबत ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय गेटसमोरून पायी जात होत्या. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजारांचे मंगळसूत्र खेचून नेले. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय परिसरात नेहमीच पोलिसांचा राबता असतो. मात्र, मुख्यालयाच्या गेटजवळच हा प्रकार घडल्याने ग्रामीण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.

Story img Loader