पुणे शहरातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाच्या आवश्यक प्रक्रिया पुणे महापालिका आणि राज्य शासनाकडून अद्यापही सुरू असल्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी फक्त खाते उघडण्यात आले असून हजारो कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय अंदाजपत्रकात फक्त नऊ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पुणे मेट्रोला यंदाच्या अंदाजपत्रकात केंद्राकडून भरीव तरतूद होईल असे सातत्याने सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र दहा कोटी एवढीच तरतूद केंद्राने केली असून मेट्रोच्या आवश्यक त्या प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याचेच त्यामुळे स्पष्ट झाले आहे. मेट्रो कंपनी स्थापन करण्याबाबत केंद्रीय नगरविकासमंत्री कमलनाथ यांनी महापालिकेला सूचना केली होती. ही कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सध्या महापालिकेकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याबरोबरच पुणे महापालिकेचा मेट्रो प्रकल्प राज्य शासनामार्फत केंद्राकडे जाणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात, तो अद्यापही राज्याकडेच असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मेट्रोसाठी अंदाजपत्रकात तूर्त खाते उघडण्यात आले असून कंपनी स्थापनेची प्रक्रिया तसेच राज्याकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्राकडून पुणे मेट्रोला निधी देण्याबाबतचा निर्णय व कार्यवाही केली जाईल.

Story img Loader