मुंबईत आणि अन्य शहरात बेस्टचा प्रवास महाग होत असताना वसई, विरारमधील नागरिकांना विनातिकिट म्हणजेच बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. नागरिकांना मोफत परिवहन सेवा देण्यासाठी महापालिकेने नुकतीच एक समिती तयार केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर देशभरात मोफत परिवहन सेवा देणारी ही पहिलीच महापालिका ठरणार आहे.
वसई विरार महापालिकेने दोन वर्षांपूर्वी शहरात परिवहन सेवा सुरू केली. अत्यल्प दरात तिकिट आकारून नागरिकांना बसमधून प्रवास करायला मिळत आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात ही परिवहन सेवा गेल्यामुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि ही सेवा यशस्वी झाली. परंतु नागरिकांना बसमधून मोफत प्रवास करता यावा अशी संकल्पना पालिकने मांडली. महासभेत त्यावर चर्चा होऊन एक समिती स्थापन करण्यात आली. मोफत प्रवास या संकल्पनेबाबत समितीचे अध्यक्ष आणि प्रथम महापौर राजीव पाटील यांनी सांगितले की, नागरिकांना मोफत प्रवास करू देणे ही आमची संकल्पना सुरुवातीपासूनच होती. नागरिकांनी खासगी वाहनांनी प्रवास न करता पालिकेच्या बसमधून प्रवास करावा आणि इंधन, पर्यावरणाचे रक्षण करावे, हा उद्देश त्यामागे होता.
‘विनातिकीट प्रवासा’साठी नागरिकांच्या सूचना मागविण्यात येणार आहेत. नागरिकांना करात परिवहन कर लावावा किंवा पेट्रोलवर अधिभार लावावा, असा विचार सुरू आहे, असे महापौर नारायण मानकर यांनी सांगितले. यासंदर्भात राजीव पाटील म्हणाले की, शहरातील प्रत्येक घरावर प्रतिदिन २ रुपये आणि आस्थापनेवर ३० रुपये कर आकारला तर परिवहन सेवेचा खर्च निघू शकतो. जाहिरात कर आणि जाहिरातींचे उत्पन्न मिळू शकते. मोफत परिवहन सेवा देणे शक्य आहे आणि सर्वाना सोबत घेऊन आम्ही नागरिकांना ही मोफत बस सेवा देऊ, असा दावाही त्यांनी केला.
 सध्या वसई विरारमध्ये ५८० किलोमीटरचे रस्ते आहेत. आणखी २०० किलोमीटरचा मार्ग वाढविण्यात येणार आहे. बसताफ्यात ५०० बसेसचा समावेश केला जाईल. जेणेकरून प्रत्येक दीड किलोमीटरवर दर १५ मिनिटांनी बस मिळू शकेल. यासाठी पालिकेने आगामी आर्थिक वर्षांत ३३० कोटींची तरतूद केली आहे.

Story img Loader