यवतमाळ नगरपालिकेचे अध्यक्ष भाजप नेते योगेश गढीया यांच्याविरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, मंगळवार, २७ ऑगस्टला या प्रस्तावावर चर्चा होऊन मतदान घेण्यात येईल. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे नगरपालिकेच्या ३१ सदस्यांच्या स्वाक्षरी असलेला प्रस्ताव सोमवारी दाखल करण्यात आला आणि लगेच त्या प्रस्तावावर मतदान घेण्याची तारीख जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्यामुळे प्रस्ताव दाखल करणाऱ्यांची आणि प्रस्ताव फेटाळणाऱ्यांची चांगलीच दमछाक सुरू झाली आहे. या प्रस्तावामुळे नगरपालिकेत घोडेबाजार तेजीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
नगरपालिकेत ४० सदस्य असून भाजपचे १६, कांॅग्रेसचे १०, राष्ट्रवादीचे ६, बसपाचे ४, अपक्ष ३ आणि शिवसेनेचा १, असे संख्याबळ आहे. सत्तास्थापनेसाठी कांॅग्रेस वगळता इतर सर्व पक्षांनी विकास आघाडी करून भाजपच्या योगेश गढीया यांना अध्यक्षपद, तर राष्ट्रवादीच्या जगदीश वाधवाणी यांना उपाध्यक्षपद बहाल केले. सुरुवातीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात दीड वर्ष भाजपकडे आणि एक वर्ष राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद राहील, असा जो अलिखित करार झाला होता त्याचे पालन न करता भाजपा नगराध्यक्ष योगेश गढीया यांनी अध्यक्षपद सोडणार नाही, अशी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने पुढाकार घेऊन अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावर भाजपच्या ११, कॉंग्रेसच्या १०, राष्ट्रवादीच्या ६, बसपाच्या ३ व सेनेच्या १, अशा ३१ नगरसेवकांच्या सह्य़ा आहेत. हा प्रस्ताव फेटाळून लावण्यासाठी नगराध्यक्ष योगेश गढीया यांना आपल्या बाजूने ११ सदस्य हवे आहेत आणि त्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखली आहे. कांॅग्रेसच्या सर्व म्हणजे, १० नगरसेवकांच्या अविश्वास प्रस्तावावर सह्य़ा असल्या तरी प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कोणती भूमिका घ्यावी, याबाबतचे आदेश प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे देणार असल्याने कॉंग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, कांॅग्रेसने या प्रकरणात आपल्याला कमालीचे दुर्लक्षित केल्याचा आरोप यवतमाळच्या आमदार नंदिनी पारवेकर यांनी करून थेट मुख्यमंत्र्यांनाच व्यथा कळवली आहे. नंदिनी पारवेकरांचा गरसमज प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी दूर केल्याचेही वृत्त आहे. आणखी असे की, भाजपात देखील गटबाजी झाली असून १६ पकी ५ सदस्यांच्या अविश्वास प्रस्तावावर सह्य़ा नसल्यामुळे पालिकेतील विकास आघाडीचे अध्यक्ष भाजपा नगरसेवक मनीष दुबे प्रतोद अर्थात व्हिप काढतील काय, याचीही चर्चा सुरू आहे. मतदानाच्या दिवशी कोणती भूमिका घ्यावी, या संदर्भात बसपा नेत्यांचीही एक बठक झाली आहे. पण, बठकीत काय ठरले, हे अद्याप बाहेर आले नाही.
अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला त्यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजू डांगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नानाभाउ गाडबले, नगरपालिका उपाध्यक्ष जगदीश वाधवाणी, कांॅग्रेस नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष, तसेच पालिकेतील विरोधी पक्षनेते बाळासाहेब चौधरी, राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सुमित बाजोरिया, शिवसनेचे गजानन इंगोले, बसपाचे हरिष पिल्लारे यांच्यासह अनेक नगरसेवक आणि विविध पक्षांचे नेते व कार्यकत्रे उपस्थित होते.

Story img Loader