कोयना धरण परिसरात पावसाची रिपरिप कायम आहे, मात्र धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी अपवाद वगळता पावसाची उघडीप आहे. सध्या कोयना धरणाची जलपातळी २ हजार ८१ फूट ८ इंच राहताना पाणीसाठा ३२.८४ टीएमसी म्हणजेच ३२.२० टक्के असून, पैकी २७.५९ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. गेल्या चार दिवसांपासून कोसळत असलेल्या कमीअधिक प्रमाणातील पावसामुळे शेतीच्या कामांनी गती घेतली आहे.
आज सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कोयना धरण क्षेत्रात सरासरी ४१ एकूण ३२३.३३, पाटण तालुक्यात १०.६६ एकूण १२७.४४ तर, कराड तालुक्यात ०.७० एकूण ४७.०९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात ४५, नवजा विभागात २१ तर महाबळेश्वर विभागात १० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. एकंदर पावसात कोयना धरण क्षेत्रात महाबळेश्वर येथे सर्वाधिक ३८० मि.मी., पाटण तालुक्यात पाटण विभागात सर्वाधिक १७५ मि.मी. तर चाफळ विभागात सर्वात कमी २१ मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली आहे. कराड तालुक्यात कोळे मंडलात सर्वाधिक ९७.९, तर इंदोली मंडलात सर्वात कमी २.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शासनाकडून नवीन ३ पर्जन्यमापक यंत्रे पाटण प्रशासनाकडे आली असून, ही यंत्रे पाटण तालुक्यातील कुठरे, मोरगिरी व म्हावशी येथे बसविण्यात आली आहेत. आज प्रारंभीच्या आकडेवारीत कुठरे विभागात ९, मोरगिरी व म्हावशी विभागात ३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आजअखेर पाऊसमान कमी झाले असल्याने बळीराजासह सर्वसामान्यात चिंता व्यक्त केली जात आहे.

Story img Loader