शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) आकस्मिक विभागात अद्यापपर्यंत साधे कुलरही लावले नसल्याने येथे उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उन्हाच्या काहिलीचा त्रास सहन करावा लागत आहे. मेडिकलमधील एसीत बसणाऱ्या अधिकाऱ्यांना साधी रुग्णांची काळजी वाटत नसल्याचेच यावरून सिद्ध होते.
दोन वर्षांंपूर्वी अत्यंत वादग्रस्त परिस्थितीत मेडिकलमधील आकस्मिक विभागाचे उद्घाटन झाले खरे परंतु अद्यापही येथे रुग्णांची दखल घेतली जात नसल्याचेच स्पष्ट होत आहे. सर्वसाधारणपणे एक एप्रिलपासून सर्वच वार्डात कुलर लावले जाते. इतरत्र कुलर लावण्यात आले. पण, आकस्मिक विभागात अद्यापपर्यंत कुलर लावण्यात आले नाहीत. त्यामुळे येथे येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. आकस्मिक विभागात एकूण १८ खाटा आहेत. येथे सतत रुग्णांची ये-जा सुरू असते. त्याचप्रमाणे व्हरांडय़ात रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर उत्तरेकडे रुग्णांच्या तपासणीची खोली आहे. या तिन्ही ठिकाणी एकही कुलर नाही. नोंदणी कक्षात एक कुलर असला तरी तो बंद स्थितीत आहे. येथे पंखे सुरू असले तरी उष्ण हवा देत असल्याने डॉक्टर, परिचारिका, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे.
एप्रिल महिना सुरू होताच उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत आहे. आज सोमवारचे तापमान तर ४२ अंश सेल्सिअरवर जाऊन पोहचले आहे. एका बाजूने रुग्णांची दखल घेतली जात असल्याचा प्रशासनाचा दावा मात्र यानिमित्ताने फोल ठरला आहे. एकीकडे मेडिकलमधील विविध कार्यालयात कुलर व एसी लागले असताना दुसरीकडे रुग्णांच्या हितासाठी साधे कुलरही लावले न गेल्याने प्रशासन किती गंभीर आहे, हेच यावरून दिसून येते.
यासंदर्भात मेडिकलचे अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय रुग्णालयात १५ एप्रिलपासून कुलर लावण्यात येतात. जुन्या कुलरची दुरुस्ती करण्यात आली असून ते उद्या, १५ एप्रिलपासून लावण्यात येणार आहेत. यानंतर मात्र रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना थंडगार हवा मिळणार असल्याचेही ते म्हणाले.