उजनी धरणात रविवारी सायंकाळी सहापर्यंत ९०.५८ टक्के पाणीसाठा जमा झाला असून येत्या एक-दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्य़ातून धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कमी झाल्यामुळे उजनी धरणातून अतिरिक्त पाणी भीमा नदीत सोडण्याचा निर्णय लगेचच घेता येणार नाही. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर येण्याचा संभाव्य धोका तूर्त तरी टळला आहे. तथापि, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणात पाण्याची पातळी ४९६.३९७ मीटर होती, तर एकूण पाणीसाठा ३१७७.११ दशलक्ष घनमीटर व उपयुक्त पाणीसाठा १३७४.३० दलघमी म्हणजे ९०.५८ टक्के इतका होता. धरणातून दोन्ही कालव्यात २८०० क्युसेक्स विसर्गाने तर बोगद्यात सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग ९५० क्युसेक्स इतका होता. धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरणात मिसळणाऱ्या पाण्याचा विचार केला असता तो कमी झाल्याचे दिसून येते. सध्या दौेड येथून १९ हजार ७६१ तर बंडगार्डन येथून १३ हजार ८३० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पुणे व सातारा जिल्ह्य़ात पडणाऱ्या दमदार पावसामुळे उजनी धरणात झपाटय़ाने पाणीसाठा वाढला आहे. वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अकलूज परिसरात नीरा नदी दुथडी भरून वाहत असून नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. संगम येथे सोडण्यात  आलेल्या पाण्याचा विसर्ग ११५० क्युसेक्स तर पंढरपुरात चंद्रभागेतील पाण्याचा विसर्ग  २० हजार ४२८ क्युसेक्स असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा