जागतिकीकरणानंतर होत असलेल्या बदलांचा अभ्यास करुन त्या संबंधांतील आर्थिक साक्षरता समाजामध्ये आल्याशिवाय आर्थिक सुधारणा अशक्य कोटीतील बाब ठरेल, असे मत ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांनी भंडारदरा येथे बोलताना व्यक्त केले.
कै. यशवंतराव भांगरे व कै. राजाबापू भांगरे यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त भांगरे प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी मुलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा, तसेच आदिवासी भूषण, राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार, यशवंत कृतज्ञता पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमात मालकर बोलत होते. अंमळनेरचे तहसीलदार प्रमोद हिले, डॉ. संजय लोहकरे, प्रा. तुकाराम रोंगटे, अशोक भांगरे, विलास शेवाळे, महिला काँग्रेस अध्यक्षा सुनीताताई भांगरे, पं. स. सदस्य दिलीप भांगरे, भाउसाहेब नाईकवाडी, सरपंच संगीता भांगरे आदी यावेळी उपस्थित होते.
मालकर म्हणाले, समाजाला पुढे नेण्यासाठी खस्ता खाल्लेल्या लोकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य आहे. भांगरे कुटूंबाने समाजासाठी जे योगदान दिले ते शब्दात व्यक्त करता येणारे नाही. पुरस्कारांनी व त्या व्यक्तीमुळे पुरस्काराची उंची वाढते ती उंची या कार्यक्रमात दिसून आली. सूत्रसंचालन आरोटे यांनी तर आभार सुनिताताई भांगरे यांनी मानले.
प्रास्तविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी केले. ते म्हणाले, माझे आजोबा, वडील, चुलते यांनी समाज बांधिलकीतून काम करण्याचे संस्कार दिले. त्यांची उतराई म्हणून आदिवासी समाजाला दिशा देण्याचे काम ज्यांनी प्रामाणिकपणे केले, त्यांचा पुरस्कार देउन सत्कार केला.
यावेळी यशवंतराव भांगरे प्रतिष्ठानच्या वतीने संतु धर्माजी मधे यांना आदिवासी समाज रत्न, बापू खाडे यांना आदिवासी भूषण तर प्राचार्य प्रकाश टाकळकर यांना राज्यस्तरीय यशवंत कृतज्ञता आदर्श पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला.

Story img Loader