दुष्काळग्रस्तांच्या वेदना साखर कारखाने चालविणाऱ्या प्रस्थापितांना जाणवणार नाहीत. शिवसेना हीच एकमेव आशेचा किरण आहे. दुष्काळात जनता होरपळत असताना मंत्री भूमिपूजन करून स्वत:चा विकास करण्यात दंग आहेत. सरकारच्या संवेदना मेल्याने त्यांना पाझर फुटत नाही. जिल्ह्य़ात दोन मंत्री असताना दुष्काळ निवारणास कोणतेही ठोस कार्यक्रम होत नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या मागण्या मान्य न झाल्यास पालकमंत्री व राज्यमंत्र्यांना जिल्ह्य़ात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे नेते मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी दिला.
शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी माजलगाव तहसील कार्यालयावर दुष्काळी मोर्चा काढण्यात आला. माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, यासह विविध मागण्या करण्यात आल्या. शाहू चौकातून निघालेल्या मोर्चात खासदार चंद्रकांत खैरे, सेना नेते मुंबईचे महापौर सुनील प्रभू, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी प्रभू यांनी जिल्ह्य़ातील मंत्र्यांच्या कारभारावर व आघाडी सरकारवर टीका केली.
जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. सरकारच्या संवेदनाच मेल्या आहेत. त्यामुळे गरिबांच्या दु:खासाठी पाझर फुटणार नाही. जिल्ह्य़ात कॅबिनेट व राज्यमंत्री, आमदार असताना दुष्काळ निवारणासाठी ठोस कार्यक्रम केला जात नाही. मोर्चाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पालकमंत्री व राज्यमंत्र्याना जिल्ह्य़ात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. खासदार खैरे, जिल्हाप्रमुख जगताप यांनीही सरकारच्या मराठवाडाविरोधी धोरणाचा व जिल्ह्य़ातील मंत्र्यांच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. विठ्ठल लगड, सचिन मुळूक, किशोर जगताप, जगन्नाथ काकडे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader