उपनगरी रेल्वे गाडय़ांतून स्टंट करत फिरणाऱ्यांवर रेल्वे पोलिसांची करडी नजर असली तरी त्या नजरेचा धाक आता शाळकरी मुलांना राहिलेला नाही. शाळेच्या गणवेशातील काही मुलांचे स्टंट दुपारच्या वेळी सुरू असतात आणि त्या मुलांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. लहान मुले आहेत, असे सांगून त्यांना केवळ दमबाजी करून पोलीस सोडून देत असल्याने त्यांची स्टंटबाजी विनाव्यत्यय सुरूच आहे.
काही दिवसांपूर्वी डॉकयार्ड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून दोन्ही पाय गमावलेला विद्यार्थी असाच बाहेर उभे राहून स्टंट करत होता. स्टंट करणारी मुले ही मुंब्रा, घाटकोपर, कुर्ला, वडाळा रोड, डॉकयार्ड रोड येथील शाळांमधील असून शाळेत जाण्याऐवजी तिकीट काढून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत फिरण्याची आपली हौस ते भागवून घेत असतात. ही मुले दुपारच्या वेळी टर्मिनसच्या फलाट क्रमांक तीन, चार किंवा पाच-सहा येथे उभी असतात. त्यांच्या अंगावर शाळेचा गणवेश असतो. मात्र गळ्यातील टाय किंवा ओळखपत्र एकाच बॅगमध्ये त्यांनी ठेवलेली असतात. एक मुलगा सर्वांची दफ्तरे सांभाळत असतो. अशी साधारण २० ते २५ मुले वेगवेगळ्या स्थानकांवरून गाडी पकडतात. वेगळ्या शाळांमधील असली तरी ती एकमेकांच्या परिचयाची आहेत, हे विशेष!
चालत्या गाडीतून प्रत्येक स्थानकात उतरायचे, गाडी सुटत असतानाथोडे धावून मग गाडी पकडायची, आपापसात दरवाजात उभे राहून मारमारी करायची, कोणी हटकले तर तेवढय़ापुरते शांत राहून पुन्हा पुढच्या स्थानकात मस्ती सुरू करायची किंवा ती गाडी सोडून दुसरी पकडायची असा या मुलांचा खेळ सुरू असतो. त्यात कोणी पडला तर इतरांनी त्याची चेष्टा सुरू करायची, एकाने १० पावले धावून गाडी पकडली तर दुसऱ्याने आणखी जास्त पावलात गाडी पकडायची, असेही खेळ त्यांचे सुरू असतात. असे स्टंट करण्यासाठी या मुलांची वेळ असते दुपारी एक ते चार वाजेपर्यंत. कारण त्यावेळी गाडीत हटकणारे कोणी विशेष नसतात आणि पोलिसांची वर्दळही कमी असते.
शनिवारी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दुपारी तीनच्या सुमारास चालत्या गाडीतून उलटा उतरणारा एक मुलगा फलाटावर पडला. त्याच्यासोबत असणारे बाकीचे सगळे पळून दुसऱ्या फलाटावर गेले. ही सर्व मुले ठाण्यापासून असे स्टंट करत येत होती. पडलेल्या मुलाला एका प्रवाशाने पकडले आणि त्याला पोलिसांकडे नेऊ लागला तेव्हा इतर मुलांनी आम्ही शाळेचे विद्यार्थी आहोत, असे सांगत स्वत:ची सुटका करून घेतली. पोलिसांची आम्हाला भीती वाटत नाही, कारण आम्ही शाळेत जाणारी मुले आहोत, असे सांगणाऱ्या या मुलांपैकी एकाच्या घरी १२ भावंडे आहेत. घरच्यांना काही फरक पडत नाही, असेही त्या मुलाचे म्हणणे होते. आम्ही शाळा बुडवलेली नाही, आमच्याकडे तिकीट आहे, असे निर्ढावलेल्या स्वरात ती मुले बोलत होती. अखेर त्या प्रवाशालाच माघार घ्यावी लागली.
स्टंट करणाऱ्या मुलांवर कारवाई करण्याबाबत रेल्वे पोलिसांकडे विचारणा केली असता, शाळेतल्या मुलांना आम्ही थांबवून ठेवतो. पण संध्याकाळ झाली की त्यांना सोडून द्यावेच लागते. अन्यथा त्यांना बालसुधारगृहामध्ये पाठविण्यासाठी त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा लागतो, असे त्यांनी सांगितले. काही वर्षांंपूर्वी असाच स्टंट करताना गंभीर जखमी झालेल्या एका विद्यार्थ्यांला अशा स्टंटच्या विरोधात जनजागृतीसाठी पोलिसांनी वापरले. पण त्याचाही परिणाम काहीही झाला नसल्याचे पोलिसांकडूनच सांगण्यात आले.
ना भीती शाळेची, ना पोलिसांची!
उपनगरी रेल्वे गाडय़ांतून स्टंट करत फिरणाऱ्यांवर रेल्वे पोलिसांची करडी नजर असली तरी त्या नजरेचा धाक आता शाळकरी मुलांना राहिलेला नाही. शाळेच्या गणवेशातील काही मुलांचे स्टंट दुपारच्या वेळी सुरू असतात आणि त्या मुलांना कोणाचीही भीती राहिलेली नाही.
First published on: 12-02-2013 at 12:12 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No fear of school and no fear of police also