* मोठा विभाग असूनही अत्याधुनिक सामग्रीचा अभाव
* सहा कर्मचाऱ्यांना केवळ प्रशिक्षण
अंगुलीमुद्रा टिपण्याचे ओमिनी यंत्र ‘सीआयडी’तही कॉलविना धूळ खात पडले असल्याची माहिती असून रेल्वे पोलिसांच्या नागपूर मुख्यालयात फिंगर प्रिंट्स युनिटच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. राज्य पोलीस दलात तपासासाठी अद्यावत उपकरणे नाहीत, अशी एकीकडे स्थिती आहे. चोरी, घरफोडी, दरोडा अथवा खून झाल्यास घटनास्थळी आरोपींच्या अंगुलीमुद्रा (ठसे) टिपण्यासाठी पॉलिरे व ओमिनी ही अद्यावत यंत्रे उपयोगी पडतात. नागपुरात पॉलिरे हे लाखो रुपयांचे यंत्र विनावापर पडून असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. सीआयडीचे अधिकारी आज या युनिटमध्ये गेले होते. त्यांनी तेथे जाऊन यंत्राची स्थिती जाणून घेतल्याचे समजते. गुन्हे शाखेच्या अंतर्गत या युनिटमध्ये पाच पदे मंजूर असली तरी सध्या केवळ दोघेचजण आहेत. तीन पदे रिक्त आहेत. असे असले तरी यंत्राचा वापर का केला जात नाही, हे कोडेच आहे.
सीआयडीमध्ये ओमिनी हे यंत्र आहे. २००२मध्ये हे यंत्र सीआयडीला देण्यात आले तेव्हा नागपूर विभागात हे यंत्र कुठेच नव्हते. पूर्व विदर्भातील जिल्ह्य़ांतून कॉल आल्यानंतर हे यंत्र घेऊन सीआयडीचे कर्मचारी घटनास्थळी जायचे आणि ठसे टिपायचे. २००९मध्ये प्रत्येक जिल्हा आणि आयुक्तालयाला पॉलिरे यंत्र देण्यात आले. तेव्हापासून सीआयडीला कॉल दिला जात नाही. त्यामुळे सीआयडीमध्येही ओमिनी यंत्र विनावापर पडून असल्याची माहिती आहे. यासंदर्भात सीआयडीचे प्रभारी अतिरिक्त अधीक्षक गोमती यादव यांना संपर्क साधला असता ‘संबंधित तज्ज्ञांकडून माहिती जाणून घ्यावी लागेल’ असे ते म्हणाले.
दरम्यान, रेल्वे पोलिसांच्या नागपूर मुख्यालयात फिंगर प्रिंट्स युनिटच नाही. इगतपुरीपासून थेट मध्यप्रदेश, छत्तीसगड व आंध्रप्रदेश सीमेपर्यंत विस्तीर्ण रेल्वेमार्ग नागपूर जिल्ह्य़ात मोडतो. एवढय़ा मोठय़ा विशेषत: नक्षलवादग्रस्त भागात मोडत असलेल्या रेल्वेच्या नागपूर जिल्ह्य़ाला अद्यापही हे युनिट महाराष्ट्र पोलीस देऊ शकलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी ठसे घेण्याच्या प्रशिक्षणासाठी रेल्वे पोलिसांच्या नागपूर मुख्यालयातून केवळ सहा कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात
आले. रेल्वेचे कर्मचारी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे घेऊन सीआयडीकडे पाठवितात. चोरी, घरफोडी आदी घटना घडल्यास नागपूर शहर गुन्हे शाखेच्या फिंगर प्रिंट युनिटला कळवितात आणि तेथील कर्मचारी घटनास्थळी येऊन ठसे घेतात. गुन्हे तपासात महत्त्वपूर्ण भूमिका असलेले फिंगर प्रिंट्स युनिट रेल्वेच्या नागपूर जिल्ह्य़ाला मिळणार तरी केव्हा, हा प्रश्नच आहे.
रेल्वे पोलीस मुख्यालयात ‘फिंगर प्रिंट’ युनिटचा अभाव
अंगुलीमुद्रा टिपण्याचे ओमिनी यंत्र ‘सीआयडी’तही कॉलविना धूळ खात पडले असल्याची माहिती असून रेल्वे पोलिसांच्या नागपूर मुख्यालयात फिंगर प्रिंट्स युनिटच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. राज्य पोलीस दलात तपासासाठी अद्यावत उपकरणे नाहीत, अशी एकीकडे स्थिती आहे.
First published on: 14-06-2013 at 02:20 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No finger print unit in railway police headquarters