अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या सरकारी उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या निवास-भोजनाची प्रत्यक्षात कोणतीही सोय नसल्याने या विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक परवड होत आहे. लोकप्रतिनिधींसह सर्व संबंधितांनी लक्ष वेधूनही याबाबत अजून कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या निवास-भोजनाचा प्रश्न कायम आहे.
नाशिक, अमरावती व नागपूर येथे ही संस्था सुरू करण्यात आली, तर लातूर व औरंगाबाद येथे इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. व्यवसाय व तंत्रशिक्षण विभागामार्फत उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था चालविण्यात येतात. एकूण १२ व्यावसायिक अभ्यासक्रम यात शिकवण्यात येतात. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेशी त्यांची संलग्नता आहे.
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन आदी सुविधा देण्यात येतील, असे पत्रकात म्हटले असले, तरी प्रत्यक्षात औरंगाबाद शहरात या संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मात्र ही सुविधा मिळू शकलेली नाही. समाजकल्याण विभागाकडून याबाबत समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याचे त्रस्त विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आमदार डॉ. कल्याण काळे, संजय शिरसाट व प्रशांत बंब यांनीही या प्रश्नी संबंधित विभागाचे लक्ष वेधून मार्ग काढण्याचे आवाहन केले.
दरम्यान, या संस्थेतील वीजतंत्री, तांत्रिक व संगणकचालक हे तीन अभ्यासक्रम घनसावंगी (जिल्हा जालना) येथे हलवण्यात आले असल्याची माहिती आहे. मात्र, विभागातील विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण गैरसोयीचे ठरत आहे. घनसावंगी हे ठिकाण उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या मतदारसंघात येते. याबरोबरच संस्थेतील काही शिक्षकांची पदेही रिक्त आहेत.

Story img Loader