सध्या वेगळ्या विदर्भाचे घोडे बेफाम उधळले आहे. मात्र, खंबीर नेतृत्वच नसल्याने वेगळा विदर्भ होणे कितपत शक्य आहे, असा प्रश्न उपस्थित करून वेगळ्या विदर्भाच्या वरातीला भवितव्यच नसल्याचे मत मिनी मंत्रालय संग्राम समितीचे संयोजक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी भंडारा येथे व्यक्त केले. विदर्भातील नागरिकांच्या भल्यासाठी नागपुरात मिनी मंत्रालयाची गरजही त्यांनी व्यक्त केली.
मिनी मंत्रालयासाठी आंदोलन छेडण्याबाबत या समितीची स्थापना जून २००९ मध्ये करण्यात आली. डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र, त्यानंतर २०१० मध्ये तेलंगणाचे वादळ उठताच विदर्भातील काही नेत्यांना वेगळ्या विदर्भाची आठवण झाली व त्यासाठी आंदोलने सुरू झाली. या आंदोलनात आपण अडसर ठरू नये म्हणून मिनी मंत्रालयाचा विषय मागे पडला. मुख्यमंत्र्यांनी वेगळा विदर्भ कधी देणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतर देखील विदर्भातील एकही नेता या विरोधात उभा ठाकला नाही. त्यामुळे आता पुन्हा मिनी मंत्रालयाचा विषय छेडण्याचा निर्णय संग्राम समितीने घेतला आहे, असे वाकुडकर म्हणाले.
या संदर्भात २५ डिसेंबरला नागपुरात विदर्भस्तरीय बैठक झाली. बैठकीत मिनी मंत्रालयाच्या मुद्याला सर्वस्तरावरील नागरिकांनी पाठिंबा दिला. बैठकीला विदर्भाच्या सर्व जिल्ह्य़ातून प्रतिनिधी तसेच सचिवालय कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. मिनी मंत्रालय विदर्भातील जनतेची निकड आहे. आज लहान सहान कामाकरिता विदर्भातील नागरिकांना मुंबई गाठावी लागते. मिनी मंत्रालय स्थापन करताना शासनाने कॅबिनेट मंत्र्यांचे कार्यालय मुंबईत ठेवावे. सर्व राज्यमंत्र्यांचे कार्यालय आणि काम नागपूर येथूनच व्हावे. कॅबिनेट मंत्र्यांचे सचिवालय मुंबईत ठेवून राज्यमंत्र्यांचे स्वतंत्र सचिवालय नागपूर येथे देण्यात यावे, कापूस, जंगल, खनिज, ऊर्जा यासारख्या विदर्भाशी संबंधित असलेल्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री व सचिवालयांचे कार्यालयही नागपुरात ठेवण्यात याव, महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन नागपूर आणि मुंबईला समान कालावधीत घेण्यात यावे, अशा समितीच्या मागण्या आहेत.
विदर्भाचा अनुशेष दूर करण्याच्या हेतूने मिनी मंत्रालय अतिशय उपयुक्त असून यांचा सत्ताधाऱ्यांनी गांभिऱ्याने विचार करावा, यापुढे संग्राम समिताच्यावतीने आंदोलन उभारण्यात येईल, असेही ते म्हणाले. वेगळ्या विदर्भाबद्दल बोलताना ते म्हणाले, वेगळा विदर्भ झाल्यास आम्हाला आनंदच आहे. मात्र, आज विदर्भाला सक्षम नेतृत्व नसल्याने वेगळ्या विदर्भाची धुरा कुणाकडे सोपवावी हा प्रमुख प्रश्न आहे. येथील सर्वच नेते केवळ राजकारण करतात ज्यांनी विदर्भ आंदोलनाची माती केली असे नेतेही विदर्भाच्या वरातीमध्ये सहभागी होऊन नाचतील आणि सत्तेची स्वप्ने पाहतील अशा वरातीला अर्थ नसल्याचे प्रा. वाकुडकर यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा