अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उर्दूचे शिक्षण मिळावे, यासाठी धाड शहरात जिल्हा परिषदअंतर्गत आठवी ते दहावीपर्यंत उर्दू हायस्कूल सुरू करण्यात आले, परंतु पाच वर्षांपासून हिंदी व मराठीच्या शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, येथील विद्यार्थ्यांना मराठीचा धडाही वाचता येत नाही. त्यामुळे येथील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पालकांनी दिला आहे.
शहरासह परिसरातील मुस्लीम विद्यार्थ्यांना उर्दू माध्यमातून शिक्षण मिळावे, या हेतूने उर्दू हायस्कूल सुरू करण्यात आले असून येथे तराडखेड, वरुड, जामठी, सोयगाव आदी गावांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षण विभागाने या शाळेला आठवी ते दहावीपर्यंतच्या सहा तुकडय़ांसह नऊ शिक्षकांच्या पदांना मंजुरी दिली, परंतु या ठिकाणी केवळ चारच शिक्षकांची पदे भरण्यात आली, तर पाच वर्षांपासून शारीरिक शिक्षक, हिंदी व मराठीच्या शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांअभावी शाळेतील चार शिक्षकांना तीन तुकडय़ांतील ४६८ विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहेत. त्यामुळे कोणकोणते विषय शिकवावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. या शाळेत आठवीत एकाच वर्गात १७४ विद्यार्थी, नववीत एकाच वर्गात १७३ विद्यार्थी, तर दहावीत एकाच वर्गात ११९ विद्यार्थी आहेत. एकाच वर्गात दीडशेहून अधिक विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे शिक्षकांना कठीण जात आहे. यावरही कळस म्हणजे, २००८ पासून या शाळेत मराठी आणि हिंदी विषयाचे शिक्षकच नाहीत. अध्रे शैक्षणिक सत्र संपले तरीही या दोन्ही विषयांची एकही तासिका न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शारीरिक शिक्षक नसल्यामुळे कवायतींचे तास, मैदानी खेळ, एनसीसी, क्रीडा स्पर्धा यांसारख्या उपक्रमांपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे.
शाळेत भौतिक सुविधांसह संगणक, प्रयोगशाळा साहित्यांची सतत कमतरता असते. शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेक्स-बेंच तर दूरच, त्यांना खाली बसण्यासाठी साध्या पट्टय़ाही देण्यात आलेल्या नाही. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही, तसेच शाळेच्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर बराच चिखल साचत असल्यामुळे विद्यार्थ्यांना चिखल तुडवतच शाळा गाठावी लागत आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देऊन शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी अनेकदा पालकांनी केली, परंतु निर्ढावलेल्या शिक्षण विभागाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दरवर्षी या शाळेच्या समस्यांमध्ये भरच पडत आहे. शाळेची अवस्था पाहता जिल्हा परिषद प्रशासन हेतुपुरस्सर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप पालक करीत आहेत. तीन दिवसांत शिक्षण विभागाने शाळेच्या समस्या सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा म. रिझवान सौदागर, म. शफीक अ. रफिक, खालीद खान, म. शफी म. सईद, शे. समी शे. गणी, म. कैसर अ. कय्युम, हाफीज मुक्तार खान यांच्यासह ३५ पालकांनी दिला आहे.

Story img Loader