तीव्र पाणीटंचाईचा परिणाम होळी व धूलिवंदनाच्या उत्साहावर झाल्याचे चित्र यंदा जालना शहरात पाहावयास मिळाले. वास्तविक, धूलिवंदनाच्या दिवशी दिसणाऱ्या उत्साहाबद्दल जालना शहर पूर्वीपासून परिचित आहे. परंतु दुष्काळ व पाण्यासाठी होणारे हाल यामुळे कधी नव्हे एवढय़ा अनुत्साहात हा सण येथे पार पडला.
दरवर्षी होळीच्या दिवशी दुपारपासून बाजारपेठ व निवासी भागात अंगावर रंग टाकण्यास प्रारंभ होत असतो. दुसऱ्या दिवशी तर दुपार उलटून गेल्यावरही धुळवडीचे वातावरण असते. परंतु यंदा मात्र धुळवडीत उत्साह नव्हता. मागील ४ दशके या सणात सहभागी होणारे जुना जालना भागातील वकील सुनील किनगावकर यांनी सांगितले की, होळीच्या रात्री व धुळवडीच्या दिवशी कचेरीरस्ता, शनिमंदिर आदी जुना जालना भागात फिरणे कठीण होत असे. आबाल-वृद्धांचा अमाप उत्साह या सणात असे. या वर्षी मात्र प्रथमच निरुत्साही होळी व धुळवड पाहिली. धुळवडीच्या दिवशी रस्त्यांवरून फिरलो असता कोणी अंगावर साधा रंगही टाकला नाही. पिण्यासाठीच पाणी नाही, तर मग रंग व त्यानंतरच्या स्नानासाठी ते कुठून आणायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. त्याचा परिणाम धुळवडीवर झाला.
नवा जालना भागातील कादराबाद, नेहरू रोड, शोला चौक, बडी सडक भागातही रंग खेळले गेले नाहीत. यंदा धुळवड रंग टाकण्याचे प्रकार फारच कमी होते. दरवर्षीचा उत्साह या वर्षी नव्हता. कारण पाण्याची टंचाई तीव्र स्वरुपाची आहे. दुष्काळी वातावरणामुळे लोक धुळवडीसाठी रस्त्यावर फारसे उतरलेच नव्हते, असे कादराबाद भागातील व्यावसायिक सखाराम मिसाळ यांनी सांगितले. जालना शहरात धुळवडीच्या दिवशी निघणारी हत्ती रिसाला मिरवणूक पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. या मिरवणुकीचे यंदा १३३वे वर्ष होते. रिसाला म्हणजे सैन्याला गावातून रस्ता दाखविणारा पायलट. गावातून सैन्य जाताना हा रिसाला सैन्याच्या समोर घोडय़ावर असायचा. दरवर्षी धुळवडीच्या दिवशी ही मिरवणूक निघते व बैलगाडीवरील लोखंडी पत्र्याच्या हत्तीवर बसलेला ‘राजा’ रेवडय़ा उधळत शहरातील प्रमुख रस्त्यांवर जातो. मिरवणुकीत रंगाची टाकी व रस्त्याने रंगोत्सव साजरा होत असतो. या वर्षी ही मिरवणूक निघाली, या वेळी रंगाऐवजी गुलालाची उधळण झाली. पाणीटंचाईच एवढी की मिरवणुकीतील लोक रंगापासून दूरच राहिले. परंपरेप्रमाणे धुळवडीच्या आदल्या दिवशी सायंकाळी समितीतर्फे होलिकोत्सव साजरा झाला, परंतु रंगाऐवजी एकमेकांना गुलाल लावून, असे ‘हत्ती-रिसाला समिती’चे अध्यक्ष अंकुशराव राऊत यांनी सांगितले.
जालना शहराजवळील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात या वेळीही धुळवडीच्या दिवशी शेतकऱ्यांचे चर्चासत्र झाले. ‘दुष्काळ : सुल्तानी की अस्मानी’ असा चर्चेचा विषय होता. या वेळी बहुतेक शेतकऱ्यांचा सूर दुष्काळ सुल्तानी असल्याचाच निघाला. गावातील माती अडविली व पाणी जिरवल्यास दुष्काळातही दिलासा कसा मिळू शकतो, हे कडवंचीच्या शेतकऱ्यांनी स्वानुभवावरून सांगितले. मोठय़ा धरणांऐवजी छोटी धरणे बांधावीत, ऊस व केळीची शेती करू नये, नदीजोड प्रकल्प राबवावा, गावातील पाणी गावातच अडवावे, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करावे आदी सूचना शेतकऱ्यांनी या वेळी केल्या. अभियंता पंडित वासरे, कृषितज्ज्ञ वराडे, प्रा. बी. वाय. कुळकणी यांच्यासह कृषी व वन विभागातील अधिकारी, शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जालन्यात धुळवडीच्या उत्साहावर ‘पाणी’!
तीव्र पाणीटंचाईचा परिणाम होळी व धूलिवंदनाच्या उत्साहावर झाल्याचे चित्र यंदा जालना शहरात पाहावयास मिळाले. वास्तविक, धूलिवंदनाच्या दिवशी दिसणाऱ्या उत्साहाबद्दल जालना शहर पूर्वीपासून परिचित आहे. परंतु दुष्काळ व पाण्यासाठी होणारे हाल यामुळे कधी नव्हे एवढय़ा अनुत्साहात हा सण येथे पार पडला.
First published on: 29-03-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No holi celebration in jalna