राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाने राज्य मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली. त्याचे जिल्हाभरात स्वागत झाले. मात्र, यंदा काही भागातच पाऊस झाला आहे. त्यामुळे चांगला पाऊस होऊन संपूर्ण तलाव भरल्याशिवाय आपण सत्कार स्वीकारणार नाही, असे नूतन राज्यमंत्री सुरेश धस यांनी म्हटले आहे.
आष्टी-पाटोदा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. या पाश्र्वभूमीवर बुधवारी ‘लोकसत्ता’ शी बोलताना मंत्री धस म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आष्टी तालुक्याला प्रथमच मंत्रिमंडळात संधी दिली. जिल्ह्य़ातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी याचे स्वागत केले. जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासासाठी सर्व मतदारसंघाचा समान विकास करण्याचा आपला प्रयत्न राहील. सध्या दुष्काळी स्थिती आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी चांगला पाऊस पडला नाही. काही भागातच पाऊस झाला. त्यामुळे कोरडे पडलेले तलाव भरत नाही, तोपर्यंत कोणताही सत्कार स्वीकारणार नाही.