भारतीय भटके व विमुक्त विकास, संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष माजी आमदार लक्ष्मण माने यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या महिला अत्याचार गुन्ह्य़ाचा आज दिवसभर तपास सुरू होता. मात्र यामध्ये कुठलीही प्रगती नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही या प्रकरणाचा सखोल तपास करून कारवाई करण्याची मागणी आज जिल्हधिकाऱ्यांकडे केली.
माने यांच्याविरुद्ध काल त्यांच्याच संस्थेतील तीन महिलांनी शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याची तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कालच तपास सुरू केला आहे. परंतु याबाबत माने यांच्याकडे अद्याप चौकशी वा त्यांना ताब्यात घेतलेले नाही.
दरम्यान माने यांच्याविरुद्ध महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपपाठोपाठ आज शिवसेनेच्याही महिला आघाडीने या प्रकरणी आंदोलन केले. महिला आघाडीच्या नंदिनी कोंढाळकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान माने यांच्याविरुद्ध प्रतिमा मलिन करण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचा आरोप शशीताई माने यांनी केला आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामात गंभीर चुका केल्यामुळेच त्यांनी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.