ठिकठिकाणी अवैधपणे होणारे घर व दुकानांचे वाढीव काम, पालिका यंत्रणेकडून सातत्याने होणारे दुर्लक्ष, केवळ निवडणुकीपुरती लोकप्रतिनिधींना नागरिकांप्रति जाणवणारी कळकळ, नाल्यांवरही करण्यात आलेले अतिक्रमण या सर्वाचा काय परिणाम होतो, याचा अनुभव यंदाच्या पहिल्याच पावसाने नाशिककरांनी घेतला. या पावसाने अनेक दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर सिडकोसह सराफ बाजार या परिसरातील अनेक कुटुंबांना रात्र जागून काढावी लागली. अशा परिस्थितीत काही नगरसेवकांनी केवळ घटनास्थळी भेट देण्याचे काम केले. तर काही जणांना तेवढीही माणूसकी दाखविणे योग्य वाटले नाही. गुरुवारी अवचित कोसळलेल्या पावसाने बळीराजा सुखावला असला तरी काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत स्थानिकांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात.
—
लोकप्रतिनिधी बेपत्ता
दर वर्षी पहिल्या पावसात सराफ बाजारात पाणी येते. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होते. २००८च्या महापुरात तर चोवीस तास सराफी दुकाने पाण्याखाली होती. बाजारात पाणी साचू नये म्हणून महापालिकेकडे वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र त्याची दखल ना आयुक्त घेतात ना महापौर. फुलबाजार परिसरही कायमस्वरूपी विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. या ठिकाणी असलेल्या सुलभ शौचालय परिसरातच भाजी बाजारही भरतो. बऱ्याचदा भाजी किंवा फुलविक्रेते खराब माल तेथेच फेकून निघून जातात. हा सर्व कचरा तेथील गटारींमध्ये जमा होतो.
हा कचरा वेळीच उचलण्याची तसदी महापालिका घेत नाही. या परिसरातील टोलेजंग इमारतीच्या तळघरात कचरा कुजलेल्या स्थितीत आहे. महापालिकेचे कर्मचारी तात्पुरते काम करून निघून जातात. दुकानांमध्ये पाणी गेले.
वीजही कित्येक तास गायब. अशी परिस्थिती असताना आमची साधी चौकशी करावयासही अद्याप कोणताच लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही.
अतिक्रमणांसोबत अनेक समस्या
सराफ बाजारचा परिसर महापौरांच्या प्रभागात येतो. महापौरपदी विराजमान झाल्यापासून अॅड. यतिन वाघ यांनी प्रभागाचा किती वेळा दौरा केला असेल हा प्रश्न त्यांनी स्वतला विचारावा. महापालिका हद्दीतील इतर विभागांचे दौरे करायला त्यांना वेळ आहे मात्र स्वतच्या प्रभागात विकास कामे तर दूर स्थानिक रहिवाशांच्या मूलभूत गरजांचाही ते विचार करत नाहीत. प्रत्येक पावसाळ्यात महापालिकेचे कर्मचारी येतात आणि मलमपट्टी करून निघून जातात. या परिसरातील गटारींमध्ये सरस्वती नाल्यातील सर्व कचरा जमा झाल्याने गटारी तुंबल्या आहेत. मागील महापुराचा विचार करता महापालिकेने कठोर उपाय योजण्याची गरज होती. मात्र तेवढे शहाणपण संबंधित अधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधांनाही नाही. त्यांना केवळ पैसा कमविण्याच्या दृष्टिने अतिक्रमणे दिसतात. तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणांसोबत येणारे प्रश्न, वाहतूक कोंडी, नागरिकांचे आरोग्य यांच्याशी त्यांचे काही देणे घेणे नाही. पाऊस पडून बारा तासांपेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी महापौर तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रभागात येण्याची तसदी घेतलेली नाही.
दुकानात पाणी शिरल्याने नुकसान
गुरूवारी झालेल्या पावसामुळे दुकानात अडीच ते तीन फुट पाणी जमा झाले. दुकानाचे फर्निचर तर खराब झाले पण बराच माल पाण्यात सापडल्याने अधिकच नुकसान झाले. दुकानासमोर असलेल्या गटारीत लोक कचरा आणून टाकतात. त्यामुळे गटार कायम तुंबलेली असते. नालाही अनेक वर्षांपासून साफ केलेला नाही. सराफ बाजार म्हणजे ओकाच्या तालीम परिसरात रविवार कारंजा, मेनरोड, भिकुसा लेन या भागातील पाणी जमा होते. परिसरात जे सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे त्या ठिकाणी पाणी जाण्याची सोयच नसल्याने पावसाळ्यात या भागात हमखास पाणी साचते. महापालिकेच्या वतीने कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली नाही.
हा कसला उपाय?
अशोक स्तंभावरून गंगापूरकडे येणारा रस्ता चढ-उताराचा असल्याने सीबीएसकडून येणारे पाणी मल्हारखाणीसमोरील रस्त्यावर साचते. यामुळे पावसानंतर या ठिकाणाहून गाडी काढणेही मुश्कील होते. इमारतींसमोर दोन-तीन गटारी आहेत. पण त्यातून पाणी आत जाण्याऐवजी घाण बाहेर येते.
गुरूवारी पाऊस सुरू असताना वीजही नसल्याने रस्त्यावर अंधार पसरल्याने लहानमोठे अनेक अपघात मोठय़ा प्रमाणावर झाले. थोडासा पाऊस पडला तरी इमारतीसमोर तळे साचण्यास सुरूवात होते.
याबाबत महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आलेले नाही. मागील महापुराप्रसंगी तक्रार केली तर त्या संबंधित अधिकाऱ्याने पाणी साचू नये म्हणून गुरांच्या दवाखान्यासमोरील रस्ता दुभाजक तोडले. हा यावरचा उपाय असू शकतो काय ?
-अनिल जैन (तेजल मेडिकल, गंगापूर रोड)
लोकप्रतिनिधींना देणेघेणेच नाही
तळघरात पाणी शिरल्याने आमच्या भाईचंद हिराचंद रायसोनी बँकेतील संगणक बंद पडले. अनेक महत्वाची कागदपत्रेही पाण्यात सापडल्याने नुकसान झाले. या परिस्थितीस जबाबदार कोण, असा प्रश्न विचारावा तरी कोणाला? समोर महापालिकेची दिमाखदार वास्तू उभी आहे. परंतु आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे याच्याशी पालिकेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना काहीही देणेघेणे नाही. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणे नित्याचे असले तरी किमान आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची तसदीही महापालिका घेत नाही. या परिसरात पाणी वाहून जाण्यासाठी किंवा गटारीत जाण्यासाठी कुठल्याच प्रकारची सोय केलेली नाही. याचा त्रास येथील व्यावसायिकांना होतो तसाच ग्राहकांनाही होत आहे. तळघरातील व्यावसायिकांच्या दृिष्टने काही सोय करणे गरजेचे आहे.
खड्डे अधिक धोकादायक
रस्त्यावर पाणी जमा झाले की नगरसेवकांना फोन करतो. ते ठेकेदाराला फोन करतात. ठेकेदार दोन-तीन दिवसात येईपर्यंत पाणी गायब होते. परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास ठेकेदार येऊन पंपाद्वारे, गटारीवरील ढापे खोलून घाण काढण्याची तसदी घेतात. मुळात हा प्रश्न उद्भवु नये यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. कित्येक वर्षांपासून मागच्या पानावरून पुढे याच पध्दतीने महापालिकेचे काम सुरू आहे. रस्त्यावर गटारींमुळे अनेक धोकादायक खड्डे झाले आहेत. पावसाळ्यात यात पाणी जमा झाल्याने वृध्द किंवा गर्भवतींना धोका पोहचू शकतो.
– धनंजय महाले (न्यु सिटी अप्लायसेंस, अशोक स्तंभ)
लोकप्रतिनिधींकडून चौकशीही नाही; दुकानदारांमध्ये संताप
ठिकठिकाणी अवैधपणे होणारे घर व दुकानांचे वाढीव काम, पालिका यंत्रणेकडून सातत्याने होणारे दुर्लक्ष, केवळ निवडणुकीपुरती लोकप्रतिनिधींना नागरिकांप्रति जाणवणारी कळकळ, नाल्यांवरही करण्यात आलेले अतिक्रमण या सर्वाचा काय परिणाम होतो.
First published on: 08-06-2013 at 02:17 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No inquiry from public representatives shopkeeper aggressive