दुष्काळामुळे धरण व तलावातील पाण्याचे साठे जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असून त्यांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येत असतानाही महसूल अधिकाऱ्यांना कुकडीच्या आवर्तनात कर्जत तालुक्याला नक्की किती पाणी दिले याची माहिती नाही. याबद्दल खासदार दिलीप गांधी यांनी नाराजी व्यक्त करताना टंचाई आढावा बैठकीस अनुपस्थित रहाणाऱ्या कुकडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याचा इशारा दिला.
खासदार गांधी यांनी येथे टंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी नामदेव राऊत, कैलास शेवाळे, सभापती सोनाली बोराटे, प्रसाद ढोकरीकर, अल्लाउदीन काझी आदी उपस्थित होते.
संपुर्ण कर्जत तालुक्यात टंचाई असताना ग्रामसेवक सज्जाच्या गावंी हजर रहात नाहीत. अनेक वेळा मोबाईल बंद असतो. प्रत्येकाला अनेक गावे असतात, मात्र त्याचा गैरफायदा घेत ते सगळीकडेच दांडी मारतात अशा तक्रारी पंचायत समितीच्या सभापती सोनाली बोराटे यांनीच केल्या. त्यावेळी बोराटे यांनी मुळेवाडीचे ग्रामसेवक यांना सकाळी कोणत्या गांवात होतात अशी विचरणा केली असता संबधीत ग्रामसेवकाने खोटेच सांगितले, ही बाबही उघड झाली. गांधी यांनी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली. ग्रामसेवक हे प्रमुख आहेत त्यांनी गावात थांबावे व त्यांनाही जवळची गावे द्यावीत असेही ते म्हणाले. कृषी विभागाबाबतही गांधी यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रकाश सुपेकर यांनी छावण्यांची तक्रार केली. अधिकारी अडवणूक करतात. कुकडीच्या पाणी मिळाले तर नाहीच, मात्र तहसिलदारांनी शेतकऱ्यांवर गुन्हे नोंदवले आहेत ते मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली.

Story img Loader