राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गोंदिया जिल्ह्य़ात मराठी माणसांचा विसर पडत असल्याचे चित्र अद्याप दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे जिल्हाध्यक्ष रितेश गर्ग यांना त्यांच्याविरुद्ध असलेल्या विविध तक्रारींवरून संघटनेतून वगळण्यात आले आणि त्यानंतर सुरू झाली नवीन जिल्हाध्यक्षांची शोधाशोध. यावेळी तरी जिल्ह्य़ात पक्ष म्हणून स्थिरावलेल्या नंतर पक्षाला आपल्या धोरणानुसार एक मराठी चेहरा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, आता पुन्हा िहदी भाषिक नावेच पुढे येत असल्याने गोंदियातील मनसे आपला ‘मराठी बाणा’ विसरले असल्याचे दिसून येत आहे.
गोंदिया जिल्ह्य़ात काही दिवसांपूर्वी मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी येथील बठकीत माजी मनसे जिल्हाध्यक्ष रितेश गर्ग व हेमंत लिल्हारे यांच्याकडून सूत्रे काढली होती. याला जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला परंतु, अद्यापही नव्या जिल्हाध्यक्षांसाठी दमदार, कणखर मराठी नेतृत्व शोधण्यात अपयश आल्याचे चित्र आहे. कारण, आज िहदी भाषिक नेत्यांच्या हातात पुन्हा मनसेच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे जाणार असल्याचे दिसून येत आहे. आज माजी नगरसेवक शिव शर्मा व नागेश दुबे यांची नावे आघाडीवर असली तरी शिव शर्मा हे जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. या मोहिमेत सुरुवातीला मनीष चौरागडे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, आर्थिकदृष्टय़ा कमजोर असल्याने चौरागडे यांचे नाव माग पडल्याचे कळते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत जी नावे पुढे येत आहेत त्यांनी तालुका पातळीवरील अध्यक्षांना वरिष्ठ पातळीवर समर्थनासाठी मोठे प्रलोभन दिले असल्याचे कळते. राज्य पातळीवर मराठी माणसाचा मुद्दा घेऊन मनसे पुढे आली असली तरी गोंदिया जिल्ह्य़ात मनसेला एक दमदार मराठी माणूस मिळू नये, ही आश्चार्याची बाब ठरत आहे. मनसेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्हा मनसेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांची फौज मोठय़ा संख्येत असली तरी या पदाच्या रेसमधून मराठी माणूस मनीष चौरागडे मागे पडले आहेत. जेव्हा त्यांना आपली वर्णी लागत नसल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी प्रशांत बोरकुटे यांचे नाव पुढे रेटले. परंतु, आधी आपसातच सामंजस्य करा, असा सल्ला जेव्हा मुंबईसह नागपुरात बसलेल्या वरिष्ठांनी दिला तेव्हाच चौरागडे व बोरकुटे यांचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट होऊन आता जिल्ह्य़ात आझाद क्रांती सेना चालविणारे नागेश दुबे व शिवसेनेतून राष्ट्रवादी व काँग्रेस असा प्रवास करणारे माजी नगरसेवक शिव शर्मा यांचे नाव जिल्हाध्यक्षपदाच्या यादीत समोर पोहोचले आहे.
जिल्हाध्यक्षपदाची खुर्ची लवकरच भरली जाणार असून आघाडीवर आज तरी नागेश दुबे व शिव शर्मा असून यापकी जो अधिक वजन खर्ची घालणार तोच आता मनसेचा नवा जिल्हाध्यक्ष होणार, हे जवळपास निश्चित झाल्याचे समजले जात आहे. मुख्य म्हणजे, या पदाच्या निवडीसाठी तालुकास्तरीय मनसेच्या शिलेदारांनी मोठा समझोता केला असल्याचे कळते. त्यामुळे गोंदिया जिल्ह्य़ातील मनसेचे शिलेदार ‘मराठी बाणा’ विसरले की काय, हे म्हणण्याची वेळ आली असून रितेश गर्ग यांच्यानंतर एखादा मराठी माणूस ही सूत्रे स्वीकारणार असल्याचे वाटत असतानाच आज मात्र जिल्हाध्यक्षांच्या शर्यतीत िहदी भाषिकांचे प्राबल्य असल्याचे प्रकर्षांने दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा