समांतर पाणीपुरवठा योजनेच्या कर्जासाठी महापालिकेने आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवलेल्या २९ मालमत्तांमध्ये छत्रपती शिवाजीमहाराज पुराण वस्तुसंग्रहालय नाही, असा खुलासा महापालिकेने बुधवारी केला. महापौर कला ओझा यांनी कोणतीही ऐतिहासिक वास्तू या कामासाठी गहाण ठेवली जाणार नाही, असे सर्वसाधारण सभेत सांगितले. तत्पूर्वी मनपासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रश्नावरून सत्ताधारी शिवसेना-भाजपावर टीका केली. महापालिकेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनपा प्रवेशद्वारासमोर कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला मनपाकडून ९५ कोटी देणे आवश्यक आहे. २०० कोटींची तूट भरून काढण्यास मनपाने आयडीबीआय बँकेकडून कर्ज घेण्याचे ठरविले. कर्जापोटी मनपाच्या २९ मालमत्ता गहाण ठेवण्याचे ठरले. यामध्ये छत्रपती शिवाजीमहाराज पुराण वस्तुसंग्रहालयाचा समावेश होता. बुधवारी वस्तुसंग्रहालय इमारतीचा भाग वगळून नेहरू बालउद्यानाची जागा तारण म्हणून मनपातर्फे ठेवण्याचे नियोजन पूर्वीच केले होते, असा दावा मालमत्ता अधिकाऱ्यांनी केला. सर्वसाधारण सभेतही यावरून गदारोळ झाला. कोणतीही ऐतिहासिक वास्तू गहाण ठेवली जाऊ नये, असे निर्देश महापौर ओझा यांनी दिले. गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती शिवाजीमहाराज पुराण वस्तुसंग्रहालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या जागा मनपाने तारण ठेवल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी व भाजपाने अशा मालमत्ता तारण ठेवण्यास विरोध असल्याचे सांगत आंदोलनही केले होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने
औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मनपासमोर निदर्शने केली. पालिकेतील शिवसेना-भाजपचा निषेध करीत अशाप्रकारे मालमत्ता तारण ठेवणाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. मनपात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून निवृत्त न्यायाधीशांमार्फत मनपा प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. घोषणाबाजीमुळे महापालिकेत काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना बोलवावे लागले. प्रवेशद्वारासमोर कार्यकर्त्यांना अडविण्यात आले. या वेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या आंदोलनामुळे सभेत या विषयावर जोरदार चर्चा झाली.

Story img Loader