आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रामध्ये शरद पवार व माझ्या पाठिंब्याशिवाय कोणत्याही पक्षाची सत्ता येणार नाही, असे मत माजी संरक्षणमंत्री मुलायमसिंग यादव यांनी व्यक्त केले.
वाळवा (ता.सांगली) येथे क्रांतिसेनानी नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा सहकारी साखर कारखान्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी मुलायमसिंग यादव प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. ज्या देशाची सिंचन व कृषी व्यवस्था नियोजनबध्द आहे, तो देश प्रगतिपथावर राहणार आहे, असा  उल्लेख करून मुलायमसिंग यादव यांनी शेजारच्या तीन देशांचे उदाहरण दिले. ते म्हणाले तेथे शेतीच्या कच्च्या मालाचा उपयोग अन्नासह प्रक्रिया उद्योगासाठी मुबलक प्रमाणात केला जातो. याऊलट आपल्याकडे देशाच्या संरक्षणासाठी मोठा खर्च करावा लागतो. शिवाय शेजारचे देश मित्र होण्यापेक्षा शत्रूच अधिक होत चालले आहेत. नागनाथअण्णांचा आदर्श घेऊन उत्तरप्रदेशात २८ साखर कारखान्यांची उभारणी केल्याचे त्यांनी सांगितले.
    मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड यांच्यासह सांगली जिल्ह्य़ातील सर्व स्मारके लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही दिली. अधिवेशन सुरू असल्याने त्यांनी घोषणा करण्याचे टाळले. कुसुमताई नायकवडी यांनी अधी करावे मग सांगावे, अशा शब्दात राज्यकर्त्यांचा चिमटा काढला. स्वातंत्र्यानंतर अजूनही धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त, सिंचनाचे प्रश्न सुटले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. वनमंत्री डॉ.पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, गृहमंत्री आर.आर.पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वैभव नायकवडी आदी उपस्थित होते.